Marathwada Sathi

कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

कोकण : एप्रिल महिना उजाडला की, अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे उन्हाळी सुट्ट्यांचे. मुलाबाळांच्या शाळा, शिक्षण, नोकऱ्यांच्या निमित्तानं मुंबई किंवा राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये वास्तव्यास असणारे कोकणकर यादरम्यान आपआपल्या गावाला जाण्याचे बेत आखू लागतात. या साऱ्यामध्ये किमान वेळात आणि किमान खर्चात प्रवास करत गावी पोहोचण्यासाठीच अनेकजण प्रयत्नशील असतात. त्यात विशेष पसंती असते ती म्हणजे रेल्वे मार्गानं प्रवास करण्याला. कोकण रेल्वे म्हणजे या सर्व मंडळींची प्रवासातील खास सोबती. कारण, हीच कोकण रेल्वे या मंडळींना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवते. म्हणजे मुंबईत झोप लागली की ही मंडळी थेट कोकणात शुभ सकाळ म्हणायला मोकळी. अशा या कोकण रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्यांची वाढणारी संख्या पाहता रेल्वे विभागाकडून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.


गर्दीवर तोडगा म्हणून कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या आणि अनेक प्रवाशांसाठी सेवा पुरवणाऱ्या हापा – मडगाव एक्स्प्रेससह हिसार-कोईम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेसला सध्याच्या घडीला तातत्पुरत्या स्वरुपात जादा डबे जोडण्यात येत आहेत. कोकण रेल्वेकडूनच याबाबतची माहिती देण्यात आली.
गाडी क्रमांक २२९०९८ हापा-मडगाव एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२८०७ मडगाव-हापा एक्स्प्रेसला ३१ मार्चला शयनयान श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडून ही गाडी धावणार आहे. याशिवाय २२४७५ हिसार- कोईम्बतूर साप्ताहिक एक एक्स्प्रेस ५ ते २६ एप्रिलपर्यंत तर, २२४७६ कोईम्बतूर – हिसार साप्ताहिक एक्स्प्रेस ८ ते २८ एप्रिलपर्यंत एक द्वितीय श्रेणीच्या वातानुकूलित जादा डब्यासह धावेल.कोकण रेल्वे मार्गावरून दरम्यानच्या काळात जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षित तिकिटांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा येत्या काळातील वाढता आकडा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं प्रवाशांनीही रेल्वेकडून पुरवण्यात आलेल्या या सुविधेचा लाभ घ्यावा.

Exit mobile version