Home अर्थकारण बँक कर्जदारांसाठी आनंदाची बातमी….

बँक कर्जदारांसाठी आनंदाची बातमी….

1060
0

मुंबई : लॉकडाऊन काळात नियमित ईएमआय भरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेतून कर्ज घेतलेल्या ग्राहकांनी लॉकडाऊन काळात ‘लोन मोरेटोरियम’चा (व्याज माफीच्या योजनेचा) फायदा घेतलेला नाही, अशा ग्राहकांच्या ईएमआयवर आकारण्यात आलेल्या व्याजावरचं व्याज कॅशबॅकच्या स्वरुपात बँकांकडून ग्राहकांच्या खात्यात जमा केले जात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गेल्या आठवड्यात सर्व बँकांना बजावले होते, “दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात वेळेवर कर्जाचे हप्ते भरणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक द्या.” ही योजना 5 नोव्हेंबरपासून लागू करावी असेही निर्देश आरबीआयने सर्व बँकांना दिले होते. त्यानुसार सर्व बँकांकडून आता लॉकडाऊनकाळात लोन मोरेटोरियमचा लाभ न घेणाऱ्या ग्राहकांच्या खात्यात कॅशबॅकची रक्कम जमा केली जात आहे.

लोन मोरोटोरियम (व्याज माफीची योजना)
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागले. अनेकांचे रोजगार ठप्प झाले. त्यामुळे आरबीआयने मार्च महिन्यात बँक कर्जदारांना कर्जाचा हफ्ता व क्रेडिट कार्डच्या बिलाचा भरणा करण्यासाठी तीन महिन्यांची सूट दिली होती. पुढे कालावधी ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आला. परंतु नंतर भरलेल्या ईएमआयवर चक्रवाढ व्याजाने पैसे वसूल केले होते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले होते. कोर्टाने दखल दिल्यानंतर केंद्र सरकारने लोन मोरेटोरियम कालावधी दरम्यान लावलेल्या चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याजातील फरक कर्जदारांना परत करण्यास मंजुरी दिली होती. यानंतर मागील आठवड्यात रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आणि एनबीएफसी कंपन्यांना ५ नोव्हेंबरपासून व्याज माफी योजना लागू करण्याचे निर्देश दिले होते. विशेष म्हणजे सर्व बँकांनी योजना ४ नोव्हेंबरपासूनच लागू केली.

या कर्जावर योजनेचा लाभ

व्याज माफी योजनेत आठ प्रकारच्या कर्जांचा समावेश आहे.

  • हाऊसिंग लोन,
  • एमएसएमई लोन,
  • एज्युकेशन लोन,
  • कन्ज्युमर ड्युरेबल्स लोन,
  • क्रेडिट कार्ड बिल,
  • ऑटो लोन,
  • पर्सनल अँड प्रोफेशनल लोन
  • कन्झप्शन लोनचा समावेश आहे.
  • यामध्ये कृषी आणि त्यासंबंधित कर्जाचा समावेश नाही.

सरकारच्या तिजोरीवर 7 हजार कोटींचा बोजा
व्याज माफी योजनेचा लाभ त्याच कर्जदारांना मिळणार आहे ज्यांनी 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत कधीही डिफॉल्ट केलेला नाही. ही सुविधा १ मार्च ते ३१ ऑगस्टपर्यंतच्या लोन मोरेटोरियमवर मिळणार आहे. यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर सात हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मोरेटोरियमच्या सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये चक्रवाढ व्याजातून साधारण व्याज कपात केल्यावर जी रक्कम शिल्लक राहणार आहे, ती कॅशबॅकच्या स्वरुपात कर्जदारांना परत करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here