Home आरोग्य चिमुकलीने दिले ‘जीवनदान’…!

चिमुकलीने दिले ‘जीवनदान’…!

295
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : नेहमीच अवयव दान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येते.वेगवेगळे रुग्णालय,आरोग्य संस्था, स्वयंसेवी संस्थांनी इत्यादींनी आत्तापर्यंत अनेक उपक्रमांतून अवयव दानाबद्दल सगळ्यांना माहिती देत आवाहन केले आहे.देशातील खूप रुग्ण अवयवांसाठी वाट बघून असतात.मात्र,असे असून सुद्धा लोक अवयव दानाकरीता पुढाकार घेत नाहीत. पण दिल्ली येथील एका जोडप्याने आपल्या २० महिन्याच्या मुलीला डॉक्टरांनी ब्रेन डेड जाहीर केले तेव्हा त्यांनी आपल्या मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या मुलीचे हृदय, किडनी, यकृत, आणि डोळे दान केले.त्यांच्या या दानामुळे आज ५ जणांना जीवनदान मिळाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ८ जाने.ला दिल्लीमधील ‘रोहिणी’ येथे राहणाऱ्या आशिष कुमार यांची मुलगी धनिष्ठा(वय १ वर्ष ८ महिने)ही बाल्कनीमध्ये खेळत असताना पहिल्या मजल्यावरून खाली पडली. त्यानंतर त्वरित तिला ‘सर गंगाराम हॉस्पिटल’ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र,फार प्रयत्न करून सुद्धा धनिष्ठा ला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही.शेवटी ११ जाने.रोजी डॉक्टरांनी धनिष्ठा हीला मेंदूमृत म्हणून घोषित केले.

धनिष्ठाचे वडील आशिष कुमार यांनी ‘ए एन आय’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “धनिष्ठाला उपचार देणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, माझी मुलगी मेंदू मृत झाली असून तिचे तब्येत पूर्ववत होणे शक्य नाही. धनिष्ठावर उपचार सुरु असताना रुग्णलयात आम्ही अनेक पालकांना भेटलो होतो. त्यांच्या मुलांना अवयवाची गरज होती. मी डॉक्टरांना विचारले की,मी माझे मुलीचे अवयव दान करू शकतो का ? डॉक्टरांनी मला होकार दिला. त्यावेळी मी आणि माझ्या बायकोने अवयव दान करण्याचा एकत्रित निर्णय घेतला. आमची आज मुलगी गेली असली तरी ती तिच्या अवयवांच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनातून एक प्रकारे जगणारच आहे.”

दरम्यान,याविषयी अधिक माहिती देत सर गंगाराम हॉस्पिटलचे अध्यक्ष यांनी सांगितले की, “आपल्या देशात अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प आहे. अनेक जण अवयव मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीवर अवलंबून आहेत. या सगळ्यात या जोडप्यांची आपल्या लहान मुलीचे अवयव दान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भविष्यात अवयव दाना बाबत सकारत्मक जनजागृती होईल असा मला विश्वास आहे. त्यांच्या या निर्णयामुळे, किडनी एक तरुणाला तर हृदय आणि यकृत लहान बाळांना देण्यात आले आहे आणि डोळे नेत्र पेढीत ठेवण्यात आले आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here