Marathwada Sathi

गॅस सिलेंडर, रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

११५ सिलेंडर व ९ क्विंटल तांदूळ असा ५ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद : पिशोर भागातील करंजखेडा गावात अवैद्यरित्या गॅस सिलेंडर व रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून मुसक्या आवळल्या. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. सुभाष तेजराव गवारे (३२), कलीमखा अय्यूबखा पठाण (३६), कडूबा माणिकराव वाघ (५५), आणि बिस्मील्ला गुलाम शेख (२७)  सर्व रा. करंजखेडा ता. कन्नड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांना पिशोर भागातील करंजखेडा गावामध्ये अवैधरित्या गॅस व रेशनच्या तांदळाचा काळाबाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती मंगळवारी मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या करंजखेडा ता. कन्नड येथे सुभाष गवारे, कलीमखा पठाण, कडूबा वाघ आणि बिस्मील्ला शेख यांच्या दुकानाची झडती घेतली. त्यावेळी दुकानात घरगुती तसेच व्यावसायीक वापराचे ११५ गॅस सिलेंडर त्यापैकी ६२ भरलेले आणि कलीमखा पठाण याच्या ताब्यात ९ क्विंटल १५० किलो स्वस्त धान्य दुकानात वितरीत केला जाणारा तांदूळ विनापरवाना बेकायदेशीररित्या काळया बाजारात चढया भावाने विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगतांना मिळून आला. या कारवाईत चौघांना पोलिसांनी अटक करून पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत एकूण ५ लाख ६१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरिक्षक संदीप सोळंके, जमादार राजेंद्र जोशी, पोलीस नाईक शेख नदीम, संजय भोसले, गणेश गांगवे, रामेश्वर धापसे यांनी केली.

Exit mobile version