Home अंबाजोगाई नागरिकांची गांधीगिरी बनली चर्चेचा विषय!

नागरिकांची गांधीगिरी बनली चर्चेचा विषय!

881
0

शहरांचे होतेय विद्रुपीकरण; नागरिक बॅनरबाजीला वैतागले!

दत्तात्रय काळे l निमित्त काहीही असो…. कोणाचा वाढदिवस असेल, कोणाची कोठे निवड झाली असेल, कोणी निवडणूक जिंकले असेल अथवा कोणी परीक्षेत पास झाले असेल… असे काहीही झाले तरी समर्थक, पाहुणे मंडळी, मित्र आदी जण अभिनंदनाचे फलक गावात किंवा शहरात हमखास लावणारच. एवढेच नाही तर कोणाचे निधन झाले तरी श्रध्दांजलीचे बॅनर लागणारच! पण हे लावत असतांना न स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतली जाते, ना कोणाला विचारले जाते.करबुडवेगिरी करणाऱ्या महानगांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या आपल्याच गावात किंवा शहरात नाही तर राज्यभरात याचा उच्छाद मांडल्याचे दिसून येईल. परंतु या प्रकाराला आता नागरिक कंटाळले असून, याविरोधात गांधीगिरी करत आहेत.
बॅनरबाज लोकांना धडा शिकवण्याची अशीच मोहीम अंबाजोगाईकरांनी उघडली आहे. अंबाजोगाई शहरातील नागरिकांनी चक्क कुत्र्यांच्या वाढदिवसाचे फलक छापून लावले आहेत. जोजो तर्फे मोती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा… असा मजकूर त्यावर छापण्यात आला असून, बंटी दादा, एंटरटेनमेंट, बड्डी जी, यो यो राणी यांचे शुभेच्छुक म्हणून नावे व फोटोही प्रकाशित केले आहेत. एकप्रकारे अवैध आणि बेकायदा लावलेल्या बॅनरच्या विरोधात आणि लावणाऱ्या महाभागांच्या विरोधात ही गांधीगिरी आहे. कायदा मोडणारे आणि करबुडवे असलेल्या बॅनरबाज लोकांनी यातून धडा घ्यावा अशी अपेक्षा लोकांतून व्यक्त होत आहे. रस्त्याच्या कडेला, विद्युत खांबावर, झाडावर, लोकांच्या घरावर महापुरुषांच्या चौकाच्या चबुतऱ्यावर, दवाखान्यांवर, शासकीय तथा निमशासकीय इमारतींवर अशी कुठलीही जागा जागा बॅनरबाज लोकांकडून सोडली जात नाही. याच गोष्टीचा सर्वसामान्य नागरिकांना आणि पशुपक्षांना याचा प्रचंड त्रास होत आहे. याच त्रासातून अंबाजोगाईकरांनी गांधीगिरी आंदोलनाची मोहीम उभी केली आहे.

बेकायदा बॅनर लावणारे करबुडवे!
शहरात किंवा गावात जाहिरातींचे बॅनर किंवा फलक लावणे ही चक्क करबुडवेगिरी आहे. विशेष म्हणजे विनापरवाना असे करणे हा गुन्हा असल्याचे स्पष्ट निर्देश कोर्टाने याअगोदर अनेक वेळा दिलेले आहेत. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल यामुळे बुडत आहे. बॅनर किंवा फलक लावण्यासाठी शासनाने ठरवून दिलेला अधिभार भरणे आणि परवानगी घेणे अत्यंत आवश्यक असते. परंतु निवडणूक आचारसंहितेचा काळ सोडला तर इतर वेळी कोणीही परवानगी घेत नाही.

प्रशासनाने कडक पाऊले उचलण्याची गरज
बेकायदेशीररित्या शहरात किंवा गावात जाहिरातीचे फलक व बॅनर लावणाऱ्या चमकी लोकांच्या विरोधात प्रशासनाने कडक पावले उचलण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ज्यामुळे या बेकायदेशीर गोष्टीला आला तर बसेलच परंतु शासनाचा कोट्यवधी रुपयाचा जाहिरात कर यामुळे बुडणार नाही. बेफाम बॅनरबाजीमुळे गावांचे होत असलेले विद्रुपीकरणसुद्धा कडक पावले उचलल्यामुळे थांबेल अशी आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here