Home औरंगाबाद नामांतराच्या वादात खेळ…..!

नामांतराच्या वादात खेळ…..!

278
0

मराठवाडा साथी
औरंगाबाद :
‘संभाजीनगर’ असा उल्लेख करणारे कार्यकर्ते आणि समर्थक शिवसेना, भाजप आणि मनसे या तीन पक्षात विभागले गेलेले, आणि औरंगाबाद असाच उल्लेख काँग्रेस आणि एमआयएम या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना हवा आहे. हिंदुत्व हीच ओळख असावी आणि त्यातील अधिक कट्टर प्रतिमा आपल्या पक्षाची असावी असा आग्रह शिवसेना आणि भाजप या दोन पक्षात असतो. कट्टर प्रतिमेच्या शर्यतीत आपलीही उडी लांब पडेल अशी वातावरण निर्मिती मनसेकडून केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात ‘संभाजीनगर’चे विभाजन अधिक मोठे आणि औरंगाबादभोवती ध्रुवीकरण जास्त असे चित्र दिसून येते.हे ध्रुवीकरण कमी करण्यासाठी कॉंग्रेसने ‘औरंगाबाद’ला समर्थन देत शहरात कमकुवत झालेला पक्ष अल्पसंख्याकांच्या समर्थनाच्या आधारे बांधता येईल काय याची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळेच प्रत्येक नेता नामांतराच्या प्रतिक्रियेमध्ये माध्यमांमध्ये आपलाही चेहरा दिसवा असे प्रयत्न करत आहे. या प्रस्तावित नामांतर राडय़ातून अलिप्त राहिलेला पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस. ‘महाविकास आघाडी’त या प्रश्नी मतभेद असल्याचे चित्र निर्माण करून कॉंग्रेसने ‘औरंगाबाद’मधील मतांचे विभाजन करावे अशी रचना केली आहे.
शहरातील २७ वार्डामध्ये यापूर्वी एमआयएमने विजय मिळविला होता. या भागात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॉंग्रेसला गर्दीही जमविता आली नव्हती. तुलनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कदीर मौलना यांच्या समर्थकांबरोबर एमआयएमच्या कार्यकर्त्यांंमध्ये वाद झाला होता. पण महापालिका निवडणुकांमध्ये अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन महापालिका निवडणुकीमध्ये काही अधिकच्या जागा हाती लागतात का, याची चाचपणी केली जात आहे. त्याचाच एक भाग कॉंग्रेसने औरंगाबादचे नामांतर न करण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.‘संभाजीनगर’मध्ये शिवसेना, भाजप यांची पकड असल्याने कॉंग्रेसला पायावर उभे ठाकण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. संघटनात्मक पातळीवर फारशी ताकद नसल्याने संधी मिळाली तर औरंगाबाद नावाभोवती उभी राहू शकते असे दिसून आल्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी नामांतर महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही अशी भूमिका घेतली. नामांतर केल्याने विकास प्रश्न मार्गी लागत नाहीत, असे म्हटले. पण हे सगळे वातावरण जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे. दहा महिन्यापूर्वी विभागीय आयुक्तांनी पाठविलेल्या प्रस्तावाची प्रत पुढे करून वृत्तवाहिनींची मुख्य बातमी झाल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक नेत्याला नामांतरावर प्रश्न विचारण्याची प्रक्रिया सुरू झाली. परिणामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नमस्ते संभाजीनगरचे फलक लावण्यात आले. तत्पूर्वी ‘हेरिटेज’ म्हणून हॅलो औरंगाबाद, सुपर संभाजीनगर, खडकी, प्रतिष्ठान असे फलकही लावण्यात आले. या फलकामुळे सुरू झालेला वाद महापालिका निवडणुकीमध्ये पुढे जाताना दिसत आहे.१९८६ पासून महापालिकेत एकदाही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे कोणाची मदत घ्यायची याचे आडाखे निवडणूकपूर्वीही बांधले जातात. वंचित बहुजनची मदत नसती तर लोकसभेत एमआयएमची जागा निवडून आली नसती. मदतीचा हा खेळ वाटय़ाला आलाच तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना बळ देता यावे म्हणून सेना आणि कॉंग्रेस नामांतराचा मुद्दा अधिक आक्रमकपणे मांडत आहेत. या प्रक्रियेत उमेदवारांची निवड करताना ‘एमआयएम’ समर्थक नाराजही होतील. ते कॉंग्रेसचे उमेदवार व्हावेत अशी व्यूहरचना केली जात आहे. अशी नाराजी शिवसेना- भाजपमध्ये निर्माण झाली तर ते नाराजही झटपट पक्षांतर करतील. त्याला पुन्हा प्रभागातील जातीच्या प्राबल्याची गणितेही घातली जातील, असे चित्र असल्याने वरकरणी नामांतराचा वाद शिवसेना- कॉंग्रेसचा वाटत असला तरी त्याला एमआयएम प्रभागातील मतविभाजनाशी जोडून पाहिले जात आहे. हैदराबादच्या निवडणुकीमध्ये भाजपने ज्या पद्धतीने प्रचार केला होता तीच कार्यपद्धती आणि विचारशक्ती औरंगाबादमध्येही वापरली जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here