Marathwada Sathi

डेटिंग अॅपवरील मैत्री पडली महागात…!

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : डेटिंग अॅपवरून महिलेशी मैत्री करणे एका तरुणाला फार महागात पडले आहे.पुण्यातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ऑनलाइन डेटिंग अॅपवर चेन्नईतील आशिषकुमारची( ३०)एका महिलेसोबत मैत्री झाली. तिने त्याला पुण्याला भेटायला बोलावले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये ते दोघे गेले. तेथे शीतपेयात गुंगीचे औषध मिसळले आणि त्याला बेशुद्ध केले. त्याच्याकडील सोन्याचे दागिने,पैसे आणि मोबाइल फोन अशी एकूण दीड लाखांची फसवणूक केली.त्यानंतर लगेच या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान,यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आशिषकुमार आणि त्या महिलेची डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. दोघे जण एकमेकांशी दररोज चॅटिंग करत होते.१८ जाने.पहाटे पाचच्या सुमारास महिलेने आशिषकुमार याला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि त्याच्या अंगावरील सोन्याची चेन,अंगठी,मोबाइल फोन आणि १५ हजार रुपये असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनंतर शुद्धीवर आलेल्या आशिषकुमार याने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.

Exit mobile version