Home देश-विदेश गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

7
0

गुजरात : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे दिग्गज नेते केशुभाई पटेल यांचे आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.
काही दिवसांपूर्वी केशुभाई यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यांच्या निधनानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केशुभाईंना श्रद्धांजली वाहिली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

केशुभाई पटेल यांचा अल्पपरिचय:

केशुभाई पटेल यांचा जन्म 24 जुलै 1928 रोजी जुनागढ येथे झाला. त्यांनी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला होता. त्यानंतर जनसंघ आणि भाजपासोबत ते मोठ्या काळासाठी जोडले गेले होते. ते दिग्गज नेत्यांपैकी एक होते. राज्यात भाजपाकडून पहिले मुख्यमंत्रीही तेच होते. काही कारणास्तव 2012 मध्ये केशुभाई पटेल यांनी आपल्या गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना केली होती. पण दोन वर्षांतच त्यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलिन केला होता.

त्यांनी दोनवेळा 1995 आणि 1998 साली गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवलं . पण 2001 मध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. विशेष म्हणजे दोन्ही वेळा त्यांना त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. याव्यतिरिक्त त्यांनी गुजरातचं उपमुख्यमंत्रिपदही भूषवलं होतं. 2001 मध्ये केशुभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती.

राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला शोक :
केशुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शोक व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here