Marathwada Sathi

औरंगाबादेत निश्चय मेळाव्यात युवा सैनिकांमध्ये राडा

निमंत्रणाची पोस्ट टाकल्यावरून दोन गट भिडले

औरंगाबाद /प्रमोद अडसुळे

वाळूज तिसगाव येथील शहर प्रमुखाने युवा सेनेच्या निश्चय मेळाव्याचे निमंत्रण देणारी पोस्ट व्हाट्सएपच्या ग्रुपवर टाकल्याने एका तालुका प्रमुखाचा इगो दुखावला आणि मेळाव्याच्या ठिकाणीच दोन्ही गट भिडले. हा प्रकार मंगळवारी शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित युवा सेनेच्या निश्चय मेळाव्यात घडला. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचे भाषण संपल्यानंतर कार्यकर्ते सभागृहातून बाहेर पडले. त्यामुळे एकच गर्दी झाली. याच गर्दीत दोन गट एकमेकांना भिडले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला तर मेळाव्याला गालबोट लागले. हे दोन्ही गट तिसगाव येथील असून त्यांच्यात कालपासूनच वाद सुरू होता असे सूत्रांनी सांगितले. 

युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत राज्यभरात निश्चय मेळावे होत आहे. विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या अनुशंगाने मंगळवारी औरंगाबादेतही संत एकनाथ रंगमंदिरात निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यासाठी औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद येथून कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने आले होते. मेळाव्यात वरुण सरदेसाई यांचे भाषण झाले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अध्यक्षीय समारोप केला. त्यानंतर सर्व कार्यकर्ते सभागृहातून बाहेर पडायला सुरूवात झाली. सभागृहाबाहेर मोठी गर्दी झाली. बाल्कनीत बसलेला आणि खाली बसलेला असे तिसगाव-बजाजनगर भागातील दोन गट एकाचवेळी बाहेर पडले. आमने सामने येताच या दोन्ही गटात हाणामारी सुरू झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. वरुण सरदेसाई आणि चंद्रकांत खैरे हे तेथून आधीच रवाना झालेले होते. त्यानंतर उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषीकेश खैरे, ऋषीकेश जैस्वाल आणि हनुमान शिंदे यांनी मध्यस्ती करत कार्यकर्त्यांना शांत करुन बाहेर पाठविले. 

नेमका वाद काय ?

शहर प्रमुखाने मेळाव्याच्या निमंत्रणाची पोस्ट तयार करून व्हाट्सएपच्या ग्रुपवर टाकल्याने तालुकाप्रमुखाला राग आला. “मी असताना तू का का निमंत्रणाची पोस्ट टाकली”? यावरून दोन दिवसांपासून वाद सुरू होता. त्यानंतर मेळावा आणि वरुण सरदेसाई यांचे भाषण शांततेत झाले. मात्र, मेळाव्यातून बाहेर पडताना दोघेही समोरासमोर आले. धक्का लागल्याच्या कारणावरून पुन्हा दोघे भिडले. त्यामुळे दोन गटात चांगलीच हाणामारी झाली.

Exit mobile version