Home औरंगाबाद लसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा

लसीकरणावरून शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा

4581
0

भाजप पदाधिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
पोलिसात परस्परविरोधी तक्रार दाखल

औरंगाबाद : कोरोना लसीकरणावरून सेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सूतगिरणी चौकात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, सकाळी दहाच्या सुमारास विजयनगरातील आरोग्य केंद्रावर भाजपचे पदाधिकारी लसीकरणासाठी देण्यात येणारे टोकण घेऊन भाजपचा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तर ओबीसी संघटनेचे काम बंद कर म्हणत भाजपचे प्रा. गोविंद केंद्रे यांना युवा सेनेचे राजेंद्र जंजाळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे भाजपच्या तक्रारीत म्हटले आहे. भाजपने जवाहरनगर पोलीस ठाण्यात तर शिवसेनेने पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

लसीकरणाचा काळा बाजार केल्याचा शिवसेनेचा आरोप

शिवसेना कार्यकर्ते आकाश सिताराम राऊत (२९, रा. हुसेन कॉलनी ग.क्र.६ गारखेडा परिसर) यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यात म्हटल्याप्रमाणे, २६ जुलै रोजी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान विजयनगर, मल्हार चौक येथील आरोग्य केंद्रातून मित्र विकास तिडके व इतर मित्रांचे फोन आले. त्यांनी सांगितले की, या केंद्रांवर कोवीड लससाठी टोकण फक्त भाजपा कार्यकर्त्यांना देत आहेत. त्यांनतर आरोग्य केंद्रावर गेलो असता तेथे धिरज केंद्रे तसेच गोविंद केंद्रे व इतर दोन भाजपा पदाधिकारी होते. आरोग्य केंद्रातील मनपा कर्मचाऱ्यांना काय प्रकार आहे सुरू आहे असे विचारले. तेव्हा त्यांनी २० टोकनच्या पुढे नंबर देत असल्याचे कळाले. त्यावर १ ते २० नंबर पर्यंतचे टोकन धिरज केंद्रे याच्याकडे आहे. तो त्याचा काळा बाजार करत आहे. त्याचवेळी धिरज केंद्रे व गोविंद केंद्रे यांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. धिरज केंद्रे यांनी धक्का बुक्की केली. तसेच “तु संध्याकाळ पर्यंत कसा राहतो ते पाहतो”. त्यांनतर मित्रासह मी निघुन गेलो. व आर्धातासाने लहान भाऊ कृष्णा राऊत याचा फोन आला. व त्याने सांगितले की, आपल्या घरासमोर भाजपाचर चिन्ह असलेली दुचाकीवर तिघेजण चक्करा मारत आहे. अशी तक्रार पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

ओबीसी मोर्च्याचे काम बंद कर म्हणत मारहाण केल्याचा भाजपाचा आरोप
धीरज गंगाधर केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रा. गोविंद केंद्रे हे मल्हार चौक, मेहरनगर येथील मनपा (लसीकरण) आरोग्य केंद्रावर असताना तिथे राजेंद्र जंजाळ व अन्य कार्यकर्ते आले. त्यांनी केंद्रे यांना फॉर्च्युनर कारमध्ये अपहरण करून सूतगिरणी चौकातील मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर नेले. तिथे त्यांना “ओबीसी मोर्च्यांचे काम बंद कर, आरक्षण मिळणार नाही. ” असे म्हणत बेदम मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अवस्थेत त्यांना तिथेच सोडून देण्यात आले. तसेच त्यांच्याजवळील रोख दहा हजार, घड्याळ व सोन्याची अंगठी काढून घेण्यात आली. तर मंत्री भुमरे यांच्या कार्यालयासमोरील सीसीटीव्ही फुटेज त्वरित ताब्यात घ्यावे असे जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

भाजपचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या
गोविंद केंद्रे यांना मारहाणीचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाणप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. तसेच शिवसेना माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

शिवसेनेला जशाच तसं उत्तर देऊ- बापू घडामोडे
शिवसेनेच्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. भाजप आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही. शिवसेनेला जशाचं तस उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

शिवसैनिकांनी मारहाण केली नाही – आ. अंबादास दानवे
भाजपचे पदाधिकारी आरोग्य केंद्रावर लसीकरणाचे टोकण ताब्यात घेऊन नागरिकांना भाजपकडून लस दिले जात असल्याचे सांगत होते. त्यामुळे हा गैरप्रकार रोखण्यासाठी शिवसैनिक तिथे गेले होते. केंद्रे यांना मारहाण झाली नाही. ते चक्कर येऊन पडले असावे.

चक्कर येऊन पडण्याचे नाटक : राजेंद्र जंजाळ

विजयनगरच्या मनपा आरोग्य केंद्रावर गेल्या अनेक दिवसांपासून नगरसेविका पती गोविंद केंद्रे हे २० क्रमांकापर्यंतचे लसीकरणाचे टोकण घेऊन जात आहेत. स्वतःच्या नातेवाईक व भाजपच्या कार्यकर्त्यांना देत आहेत अशा तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. तिथे कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे टोकण वाटप करण्याचे सांगून केंद्रे यांच्यासह आम्ही चहा घेण्यासाठी सूतगिरणी चौकात आलोत. तिथे भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेलो. तेव्हा केंद्रे हे फोनवर बोलत बाहेर उभे होते. त्यावेळी त्यांनी माझ्याबद्दल अपशब्द वापरले. ते आमच्या एका कार्यकर्त्याने ऐकले. त्यावेळी तिथे बाचाबाची झाली. तेव्हा केंद्रे चक्कर येऊन खाली पडले. त्यांना मी माझ्या वाहनातून सिग्मा हॉस्पिटलमध्ये नेले. सर्व चाचण्या करून घेतल्या. त्यांच्या अंगाला एक ओरखडा देखील नाही. कोणत्याही डॉक्टरांनी त्यांची तपासणी करावी ओरखडा जरी असेल तर शिक्षा भोगेन. भाजपकडून केवळ राजकारण केले जात आहे. चक्कर येऊन पडण्याचे नाटक केल्याचे दिसून येत आहे.

शहानिशा केल्यानंतर दाखल होईल – एपीआय सोनवणे

आकाश राऊत यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. सर्व प्रकारची शहानिशा केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईल, असे पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.

केंद्रे यांचा जवाब नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल होईल – पीआय पाटील

धीरज केंद्रे यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. गोविंद केंद्रे यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याने त्यांचा जवाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही. त्यांचा जवाब नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे जवाहर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here