बीड : आष्टी तालुक्यामध्ये नरभक्षक बिबट्याने दोन जणांचा बळी घेतल्यानंतर जिल्ह्यातील शेतकर्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतर तालुक्यातही बिबट्या आहे का? अशा चर्चा होऊ लागल्या. पिंपरगव्हाण शिवारामध्ये काही दिवसांपासून बिबट्याबाबत चर्चा होत असून एका शेतकर्याच्या शेतात पायाचे ठसे आढळून आल्यानंतर याबाबत काही शेतकर्यांनी काल वन विभागाकडे जाऊन तक्रार दाखल केली. सदरील पायाचे ठसे बिबट्याचे आहेत की तडसाचे? याबाबत चर्चा होत आहे. बिबट्याच्या भीतीपोटी शेतकरी शेतामध्ये जाण्यास टाळू लागले आहेत.
आष्टी शिवारामध्ये काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला. एका शेतकर्याला ठार केल्यानंतर काल पुन्हा एका मुलाचा नरभक्षक बिबट्याने जीव घेतला. तर बेदरवाडी शिवारात एक गाय आणि एका शेळीचा फडशा पाडला. या तिनही घटना आठ दिवसांच्या कार्यकाळात घडल्याने जिल्हाभरातील शेतकर्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतर ठिकाणीही बिबट्याचा वावर आहे काय? अशी भीती लोकांना आता वाटू लागली आहे. पिंपरगव्हाण शिवारामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याबाबतच्या चर्चा होत आहे. एका शेतकर्याच्या शेतामध्ये पायाचे ठसे आढळून आले त्याचबरोबर ठिबकचे पाईपही दाताने कुरतडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पिंपरगव्हण परिसरातील शेतकर्यात अधिकच भीती निर्माण झाली आहे. काल काही शेतकर्यांनी वन विभागाकडे जाऊन या ठश्यांबाबत तक्रार केली. हे ठसे बिबट्याचे आहेत की, तडसाचे? याबाबत चर्चा होत आहे. बिबट्याच्या भीतीपोटी पिंपरगव्हाणसह परिसरातील शेतकरी शेतामध्ये जाणे टाळू लागले आहेत.
शेतात आढळून आलेल्या पायांच्या ठस्यांमुळे पिंपरगव्हाण परिसरातील शेतकरी भयभीत
ठसे बिबट्याचे की तडसाचे ? वनविभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार