Marathwada Sathi

एवढ्या मोठ्या शक्तीशाली केंद्र सरकारसमोर ‘शेतकरी’ एकाकी लढतोय…!

मराठवाडा साथी न्यूज

सांगली : मुंबईवर आता शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ धडकले आहे.दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरीता शेतकरी आज मुंबईत एकजूट झाले आहेत.आज शेतकऱ्यांचा हा मोर्चा राजभवनावर जाणार असून यासोबतच सांगलीतही शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात सांगली-कोल्हापूर असा हा ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देत राजू शेट्टी म्हणाले की, “आम्ही कोणाच्याही पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केलेली नाही. कारण गेल्या जून महिन्यापासून आम्ही सातत्याने केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात आम्ही लढतोय. यासंदर्भात पहिला अध्यादेश जून महिन्यात निघाला, तेव्हापासून आम्ही सातत्याने या तीनही कायद्यांना सातत्याने विरोध करतोय. या आंदोलनासाठी कुणी पाठिंबा देईल किंवा कोणत्याही राजकीय पक्षाकडून ताकद मिळले अशी अपेक्षाच ठेवली नाही.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी विरोधी पक्षावर नाराज आहे. संपूर्ण देशातील शेतकरी एवढे मोठे आंदोलन करतांना ज्या ताकदीने विरोधी पक्ष या आंदोलनात सहभागी होणे अपेक्षित होते,मात्र काही फुटकळ वक्तव्य वगळता फारसे काही या विरोधी पक्षांनी केलेले नाही.”

“शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून शेतकरी ताकदीने आंदोलन करत आहेत. एवढ्या मोठ्या शक्तीशाली केंद्र सरकारसमोर शेतकरी एकाकी लढतोय”.शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या याविषयी ते म्हणाले की, “यामध्ये चर्चा करण्यासारखा मुद्दाच नाहीये. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली तीन कायदे सरकार लादू पाहततेय.असे कायदे लागू करा किंवा अशाप्रकारचं धोरण राबवा म्हणून कोणी मागणी केलेली होती? कोणत्या शेतकरी संघटनेने मागणी केलेली होती? कोणीच अशी मागणी केली नव्हती.जी मागणी केली जातेय, ती तुम्ही पूर्ण करत नाही.”असेही यावेळी शेट्टी म्हणाले.

Exit mobile version