Home देश-विदेश नापिकीला कंटाळून बीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकीला कंटाळून बीड जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

736
0

परळी तालुक्यातील मैंदवाडी गावातील घटना

परळी : सततची नापिकी आणि खाजगी कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या आणखी एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नवनाथ रमाकांत होळंबे (४२, रा. मैंदवाडी, ता. परळी, जि बीड) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घरामागील झाडाला शुक्रवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान त्यांनी गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीणचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, सहायक निरीक्षक बोडखे, जामदार नामदेव चाटे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर नवनाथ यांचा मृतदेह धर्मापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. दरम्यान, मंडळाच्या तलाठी नीता पल्लेवाड यांनीही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

नवनाथ रमाकांत होळंबे

नवनाथ होळंबे यांची मैंदवाडी गावात चार एकर कोरडवाहू शेती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतीतून उत्पन्न निघत नसल्याने ते कायम तणावात असायचे. कुटुंबाचा उदर्निवाह करण्यासाठी पैसा नसल्याने शेतात पेरणी करून काहीतरी उत्पन्न निघेल या आशेवर नवनाथ खाजगी कर्ज काढून पेरणी करायचे. मात्र, मराठवाड्यात मागील अनेक वर्षांपासून पावसाने पाठ फिरवली असल्याने दरवर्षी त्यांची निराशा व्हायची. यंदा त्यांनी तीन वेळा पेरणी केली मात्र पावसानेच शेतीतील पिकं आडवी झाली. त्यामुळे नवनाथ आणखीनच तणावग्रस्त झाले. त्यांना दोन लहान मुलं तर दोन मुली आहेत. एक मुलगी दहावी तर मोठी मुलगी बारावीत शिकत आहे. पुढे दोन वर्षांनी मोठ्या मुलीचे लग्न करावे लागेल मात्र, त्यासाठी पैसे कुठून आणू असे ते कुटुंबीय व मित्रांकडे नेहमी बोलून दाखवायचे. कुटुंबीयांनी त्यांना तणावातून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, अखेर शुक्रवारी नवनाथ यांनी टोकाचे पाऊल उचलेलेच. घरामागे असेलल्या झाडाला पहाटेच्या वेळी गळफास लावून जीवन संपविले. ही घटना उघडकीस येताच परळी तालुक्यात एकच खळबळ उडाली. निर्व्यसनी व शांत स्वभावाचे नवनाथ होळंबे यांच्या आत्महत्येचा सर्वाना मोठा धक्का बसला आहे. नवनाथ यांच्या आत्महत्येमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे सरकारने नवनाथ यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत त्यांच्या पाल्याला शासकीय नौकरीत सामावून घेण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here