Marathwada Sathi

सततच्या भांडणातून संताप अनावर, नवऱ्याने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं

जळगाव: धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बु्द्रुक येथे पतीने संशयावरून महिलेला पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात या महिलेचा मृत्यू झाला. यात संशयित पती देखील ५५ टक्के भाजला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. मीराबाई संतोष भिल (५५) असे या मृत महिलेचे नाव आहे. तीला पती संतोष आखाडे भिल (६३) याने पेटवून दिले.प्राथमिक माहितीनुसार, जखमी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर तिला पेटवणारा पती देखील ५५ टक्के भाजला असून त्याचीही प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष भिल हा वेगवेगळ्या कारणावरुन त्याची पत्नी मिराबाई हिच्यासोबत नेहमी वाद घालत असे. अशाचप्रकारे सततच्या भांडणामुळे संतोष हा गेल्या दोन वर्षांपासून पत्नी मिराबाई हिच्यापासून वेगळा राहत होता. पत्नी मिराबाई ही मुलासह हिंगोणे बुद्रुक गावात राहत होती, तर तिचा पती संतोष हा एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राहत होता.

सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास संतोष हा हिंगोणे बुद्रुक गावात आला. यावेळी त्याची पत्नी मिराबाई ही बकरी बांधण्याच्या वाड्यात झोपलेली होती. यावेळी संतोष याने मिराबाई हिच्या चारित्र्यांवर संशय घेत तिच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी संतापाच्या भरात संतोष याने पत्नी मीराबाईच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. आईच्या आवाजाने मुलगा शिवदास हा उठला असता, त्याला बकरीच्या गोठ्यात आई पेटताना दिसली. यावेळी त्याने तिला विझविण्याचा प्रयत्न करत तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र मीराबाई यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. नऊ तासानंतर उपचार सुरु असतांना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मिराबाई हिची प्राणज्योत मालवली.

यादरम्यान मिराबाई हिच्यावर पेट्रोल टाकताना, काही पेट्रोल स्वत: संतोष याच्यावरही अंगावर उडाले होते, पत्नीला पेटविताना संतोष सुध्दा जळाला होता. संतोष हा ५५ टक्के भाजला असून त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपअधीक्षक कृषीकेश रावले, धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक उध्दव डमाळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी मयत मिराबाई यांचा मुलगा शिवदास संतोष भिल (वय ३१) याच्या फिर्यादीवरुन संतोष भिल याच्याविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जिभाऊ पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version