Marathwada Sathi

ठाण्यातून निवडणूक लढत जिंकून दाखवणार” आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिवसेना ( ठाकरे गट ) काँग्रेस, राष्ट्रवादीने बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयावर ‘जनप्रक्षोभ मोर्चा’ काढला होता. यानंतर झालेल्या सभेत आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं. विद्यमान सरकार औटघटकेचे असून, ठाण्यातून निवडणूक लढून जिंकून दाखवणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

याला आता मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “लोकशाहीत कुठूनही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. शेवटी जनता ठरवत असते, कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं. बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून शाखाप्रमूख म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.“शिवसेना मोठी करण्यासाठी माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून घरावर तुळशीपत्र ठेवलं. सोन्याचा चमचा घेऊन आलेले आणि आयत्या पिटावर रेघोट्या ओडणाऱ्यांबद्दल मी काय बोलणार,” असा टोला एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

‘‘फेसबुकवर फक्त मजकूर प्रसारित केला म्हणून महिलेला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. पोलीस मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करीत नाहीत. आयुक्त कार्यालयात थांबत नाहीत. कारण ते ‘वर्षां’वर जाऊन मुख्यमंत्र्यांचे आदेश घेत आहेत. एका व्यक्तीने स्वार्थापोटी आणि राक्षशी महत्त्वाकांक्षेपोटी राज्याला अंधारात नेले आहे’’, अशी टीका आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली.‘‘हे गद्दारांचे सरकार काही वर्षांचे, काही महिन्यांचे नसून, काही तासांचे आहे. ते कोसळल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर सरकारला मदत करणाऱ्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील’’, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

Exit mobile version