Marathwada Sathi

मृतांच्या नावाने बोगस चाचण्या ; कुटूंबातील सदस्य अडचणीत…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी मुंबई : कोरोनाचे संकट कायम असताना आता गैरव्यवहार होत असल्याची बाब पुढे आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. कुटुंबातील व्यक्तींच्या, मृतांच्याही नावाने बोगस कोरोना चाचण्या केल्या जात आहे.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मागणीनंतर महापालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोरोना चाचणी केंद्राकडून कुटुंबातील एकाच व्यक्तीची कोरोना टेस्ट करुन कुटुंबातील इतर व्यक्तींची टेस्ट न करता त्यांची कोरोना टेस्ट केल्याचे दाखवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आरोप ‘मराठा क्रांती मोर्चा कोअर कमिटी’ चे सदस्य ‘अंकुश कदम’ यांनी केला आहे. याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तात्काळ चौकशीची मागणी केली होती. कोरोना चाचणी करण्यासाठी घरातील एखादी व्यक्ती महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रात गेल्यास, महापालिकेकडून त्या व्यक्तिची माहिती जाणून घेताना त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांची देखील माहिती नोंद करुन घेतली जाते. त्यानंतर त्या व्यक्तिच्या कुटुंबातील व्यक्ती त्या केंद्रावर गेलेल्या नाही. तसेच त्यांनी कुठल्याही प्रकारची चाचणी केली नाही. दरम्यान मजरुतांच्या कुटुंबातील व्यक्तींची कोरोना चाचणी झाल्याचे आणि त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे महापालिकेकडून दाखविण्यात येत असल्याचा आरोप ‘मराठा क्रांती मोर्चाच्या’ पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

Exit mobile version