Marathwada Sathi

नका करु निष्काळजीपणा, आपल्याच हातात आहे कोरोनाला टाळा !

बीड : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने पुन्हा आपले डोकेवर काढले आहे. जगातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने येथील जनता मोठ्या भयावह परिस्थिती मध्ये जगत आहे. भारत देशातही पुन्हा एकदा कोरोनाने आपले अक्राळ विक्राळ रूप विस्तारण्यास सुरुवात केली असून देशाची राजधानी दिल्लीसह राज्याची राजधानी मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बीड जिल्ह्यामध्ये ही गेल्या काही दिवसांपूर्वी कमी झालेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा शंभरी गाठत असल्याने ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन निष्काळजीपणा न करता नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोनाची दुसरी लाट थोपविणे आवश्यक आहे. कोरोना पासून बचाव करणे आपल्याच हातात असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
गेल्या चार-पाच दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र पुन्हा दोन दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या शंभरी गाठत असल्याने चिंतायुक्त वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारी प्राप्त झालेल्या ८५७ संशयित रुग्णांच्या अहवालांमध्ये ७८४ कोरोना निगेटिव्ह तर ९३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या बीड तालुक्यातील असून आजच्या अहवालात तब्बल ४२ को रोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर अंबाजोगाई ४, आष्टी ११, धारूर १, गेवराई १०, केज ६, माजलगाव ५, परळी १०, शिरूर २ तर वडवणी तालुक्यात २ पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. आज १०१ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या दोन दिवसात ७ कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत ३,५०,०६२ संशयित रुग्ण आढळून आले असून यातील १,४३,०४० रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये १,२८,०९१ रुग्ण कोरोना निगेटिव्ह निघाले असून १४,९४९ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९२.६४ % असून पॉझिटिव्हिटी रेट ११.४% तर डेथ रेट ३.१४ % आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४७० तर इतर जिल्ह्याच्या पोर्टलवर नोंद असलेले ४ असा एकूण ४७४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. गेल्या दोन दिवसात ७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा डब्लिंग रेट १३९.७असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा प्रति रुग्ण रेशो २३.४१ आहे. जिल्ह्यातील १,४३,०४० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यातील १,२८,०९२ रुग्ण निगेटिव्ह निष्पन्न झाले आहेत. बीड जिल्ह्यातील कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९२.६३ टक्के आहे. आरोग्य विभाग कोरोना व्हायरस सोबत युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याने कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असली तर मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशासह राज्यात सुरू झालेल्या कोरोना व्हायरसची दुसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या नियमांचे पालन केले तर आपण कोरोनाची दुसरी लाट रोखू शकतो. त्यासाठी नागरिकांनी निष्काळजीपणा टाळून कोरोनाला रोखण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे.

बाजारपेठेतील गर्दी धोकादायक!
दिवाळी सण संपला असला तरी बाजारपेठेत नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. तोंडाला मास्क न लावता खुलेआम फिरत असल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. नागरिकांनी आपल्या स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाची आणि आपल्या समाजाची काळजी म्हणून तोंडाला मास्क लावणे, सातत्याने हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, काम असेल तरच घराबाहेर पडणे, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना विणकामाचे घराबाहेर न पडून देणे या काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

भाजीपाला आडत मार्केटमध्येही तोबा गर्दी
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दररोज सकाळी भाजीपाला आडत मार्केट सुरू असते. याठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने भाजीपाला घेऊन येतात. तसेच त्यांची खरेदी करण्यासाठी भाजीपाला विक्रेते आणि इतर नागरिक या मार्केटमध्ये मोठी गर्दी करत असतात. मात्र आडत मार्केटमध्ये कसल्याही प्रकारची काळजी पाळली जात नसल्याने हे भाजीपाला आडत मार्केट कोरोना वायरस पसरविण्याचे केंद्र बनू शकते. याची काळजी आडत मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांसह त्यांची खरेदी करणारे ठोक विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिक घेणे आवश्यक आहे.

Exit mobile version