Marathwada Sathi

“तो”आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का?

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपा नेत्यांना सवाल केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या आणि बोलणाऱ्या भाजपा नेत्यांना रोहित पवार यांनी सवाल केला आहे. त्याचबरोबर अर्णब गोस्वामी यांच्यावर केंद्र सरकार कारवाई करणार की, पाठीशी घालणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.“लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपाच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपाच्या त्या नेत्यांनी सांगावं. फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!’,” असा सवाल रोहित पवारांनी भाजपा नेत्यांना केला आहे.

दरम्यान अर्णब गोस्वामी यांची चाट समोर आली आहे. यामध्ये अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात पार्थ यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय (यूजलेस) असा केला आहे. त्याचबरोबर समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, अशा शब्दांत गोस्वामी यांनी पार्थ यांना दिलासा दिल्याचे उघड झाले आहे. याशिवाय फेब्रुवारी २०१९मध्ये पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडविलेल्या आत्मघातकी हल्ल्याबाबत अर्णब यांचे आक्षेपार्ह विधान आढळते. या हल्ल्यात ४० केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. या व्हॉट्सअ‍ॅप संवादात पुलवामा हल्ल्याबाबत अर्णब यांनी केलेल्या विधानाचा समाचार नागरिकांनी ट्वीटरसह अन्य समाजमाध्यमांवरून घेतला.

Exit mobile version