Marathwada Sathi

डोंगरी भागाच्या विकासासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत

पालकमंत्री अध्यक्ष तर जिल्हा नियोजन अधिकारी सचिव; तीन अशासकीय सदस्यांचा समावेश

परळी l बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, पाटोदा, परळी-वैजनाथ, अंबाजोगाई, धारूर, केज हे तालुके डोंगरी विभाग विकास गटात उपगट तालुके म्हणून समाविष्ट आहेत. या तालुक्यात येणाऱ्या डोंगरी भागाच्या विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी गठीत करण्यात आली आहे. या कमिटीत पालकमंत्री आणि इतर पाच आमदारांचा समावेश आहे. त्याचबरोबर दोन अशासकी पुरुष सदस्य आणि एका महिला सदस्याचा समावेश आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अग्रणी बँकेचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी हे पदसिद्ध सदस्य आहेत. तर जिल्हा नियोजन अधिकारी हे पदसिद्ध सचिव आहेत.
डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्याने जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. पालकमंत्री ना.धनंजय मुंडे हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत तसेच ते परळी वैजनाथ उपगटाचे सदस्यही आहेत. त्याचबरोबर धारूर उपगटातून आ.प्रकाश दादा सोळंके, आष्टी-पाटोदा उपगटातून आ.बाळासाहेब आजबे, केज-अंबाजोगाई उपगटातून आ.नमिता मुंदडा, बीड उपगटातून आ.संदीप क्षीरसागर हे पदसिद्ध सदस्य म्हणून या समितीत समाविष्ट आहेत. डोंगरी भागाशी संबंधित इतर अशासकीय सदस्य म्हणून 2 पुरुष आणि एक महिला निवडण्यात येते. त्यात परळी तालुक्यातील मोहा येथून विष्णुपंत देशमुख, आष्टी तालुक्यातील म्हसोबची वाडी येथील शिवदास रोकडे आणि महिला सदस्या म्हणून मैंदवाडी, ता.धारूर येथील सौ.भाग्यश्री मैंद यांची निवड करण्यात आली आहे. याच समितीत शासकीय समिती सदस्य म्हणून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अग्रणी बँकेचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांचा समावेश असतो. तर जिल्हा नियोजन अधिकारी हे पदसिद्ध सचिव आहेत.  जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली डोंगरी भागाचा विकास करण्याच्या अनुषंगाने ही समिती जिल्हा नियोजन विभागाद्वारे काम करते.

Exit mobile version