Home आरोग्य रांजणगावात मुदतबाह्य पोषण आहाराचे वाटप ; नागरिकांच्या जीवाशी खेळ !

रांजणगावात मुदतबाह्य पोषण आहाराचे वाटप ; नागरिकांच्या जीवाशी खेळ !

3290
0

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील लाभार्थी मागील तीन महिन्यापासून पोषण आहारापासून वंचित होते. त्यामुळे प्रशासनाने सारवासारव करण्यासाठी जून महिन्याचा मुदतबाह्य पोषण आहार ऑगस्टमध्ये वाटप करण्याचा घाट घातला. परिणामी दोन महिन्यांचीच मुदत असलेला पोषण आहार मुदत संपल्यानंतर लाभार्थ्यांच्या हाती पडल्याने प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बचत गटामार्फत हा पोषण आहार तयार करून घेतला जातो हे विशेष. त्यामुळे हलगर्जीपणा करून नागरिकांच्या जीवावर उठलेल्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई कारण्याची मागणी होत आहे. (It is special that this nutritious food is prepared by a self help group. Therefore, action is being demanded against the concerned officials and employees who have taken the lives of the citizens due to negligence.)

वाळुज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील “गुलाब महिला बचत गटा”कडून टीएचआर आहाराचा पुरवठा केला जातो. मात्र, बचत गटाने जून महिन्यात पोषण आहार पुरवठा वेळेत केला नाही. त्यामुळे आता जून व जुलै अशा दोन महिन्यांचा आहार पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, वाटप करण्यात येत असलेल्या पोषण आहाराच्या पाकिटावर १९ जून २०२१ ची उत्पादनाची तारीख असून या आहाराची दोन महिन्यापर्यंत वापर करण्याची मुदत आहे. परिणामी, मुदतबाह्य असलेला पोषण आहार वाटप होत असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहेत. मुदत संपलेल्या तारखेचा माल हा रांजणगाव येथील ३० पेक्षा जास्त अंगणवाडीमध्ये वाटप करण्यात आल्याची माहिती आहे. यापैकी अनेक अंगणवाडी सेविकांनी त्याचे वाटप देखील केले असून लाभार्थ्याकडून ते खाण्यात देखील आले आहे. हा पोषण आहार सहा महिने ते 3 वर्षापर्यंतच्या वयोगटातील बालक, गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी दिला जातो. त्यामुळे मुदतबाह्य पोषण आहार देऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याविषयी माहिती मिळताच उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. यावर त्यांनी पुरवठादाराशी चर्चा केली असता त्यांनी माल ऑगस्ट महिन्यातच उत्पादित झाला असून बॅग जुन्या वापरण्यात आल्याची माहिती दिली. यावर मिरकले यांनी संबंधित माल न वाटण्याच्या सूचना दिल्या असून जून व जुले महिन्याचा पोषण आहार टेस्टिंग साठी पाठवण्यात आला आहे. तर याविषयी माहिती घेण्यासाठी पोषण आहार उत्पादक बचत गटाच्या अध्यक्षांशी अनेक वेळा संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

म्हणे पॅकिंग बॅगवर जुनी तारीख…

या भागात मी स्वतः टिमसोबत भेट दिली आहे. मुदत संपलेला पोषण आहार हा काही अंगणवाड्याना मिळाला आहे असे निदर्शनास आले आहे. हा सर्व पोषण आहार ऑगस्टमध्येच उत्पादित केला आहे. मात्र, जुन्या तारखेच्या पॅकिंग बॅग वापरण्यात आल्याचे बचत गटाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, तरीही त्यांच्यावर विश्वास न ठेवता जून आणि जुलै महिन्याचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले आहे. त्यासोबतच मुदतबाह्य आहाराचे वाटप देखील थांबविण्यात आले आहे.

प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here