Marathwada Sathi

वारी येथे दिवाळीनिमित्त गरजूंना कपडे व मिठाई वाटप, राहुलदादा टेके पाटील ट्रस्टचा उपक्रम

कोपरगाव : किसन पवार:
तालुक्यातील वारी येथील राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक बांधिलकीतून गावातील सर्वच वयोगटातील सुमारे ४५ गरजवंत लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त कपडे तसेच मिठाई वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविला. हा कार्यक्रम वारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रविवार ३१ ऑक्टोबर रोजी पार पडला. या कार्यक्रमात दिवाळीनिमित्त मिळालेल्या या मदतरूपी भेटीमुळे लहानांपासून, वयोवृद्ध आजी-आजोबा, माता- भगिनीच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता.
या कार्यक्रमासाठी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, माजी सभापती मच्छिंद्र टेके, वारी सेवा संस्थेचे माजी संचालक मधुकरराव टेके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सतीश कानडे होते. कार्यक्रमाला राहुलदादा टेके यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी सचिन सूर्यवंशी म्हणाले, श्रम, संवाद आणि संस्कार या तीन गोष्टीच्या संगमातून राहुल दादाचे कार्य सुरु होते. त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे सामाजिक उपक्रम त्यांच्यानंतरही सुरु आहे ही आनंदाची बाब आहे. वासुदेव देसले म्हणाले, आपण दुःखात असताना देखील गरजवंतांना मदत करण्यासाठी खूप मोठे हृदय लागते. आणि त्याच माध्यमातून हा उपक्रम राबवून अनेकांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम केले आहे. शांताराम गोसावी म्हणाले, मरावे परी कीर्ती रुपे उरावे या उक्तीप्रमाणे राहुल दादाचे कार्य होते आणि आज त्यांच्यानंतर देखील ते सुरु आहे. डॉ. विकास घोलप म्हणाले, समाजासाठी धडपड करणारा एकदा व्यक्ती आपल्यातून अकाली गेल्यास समाजात त्याची खूप मोठी पोकळी निर्माण होते. यावेळी मच्छिंद्र टेके, डॉ. वरद गर्जे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे व ‘लोकमत” चे उपसंपादक रोहित टेके यांनी केले.
या कार्यक्रमासाठी वारीचे माजी सरपंच बद्रीनाथ जाधव, सेवा संस्थेचे अध्यक्ष नवनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा गजभीव, प्रकाश गोर्डे, संजय जाधव, अनिल गोरे, विजय ठाणगे, नरेंद्र ललवाणी, कामगार पतपेढीचे अध्यक्ष अशोक गजभिव, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संजय टेके, वैद्यकीय अधिकारी डॉ. वरद गर्जे, डॉ. राजेंद्र पारखे, मंजाहरी टेके, नानासाहेब गोर्डे, पंडित वीर, विजयसिंह गायकवाड, गौतम दोशी, चंद्रकांत पाटील, मच्छिंद्र मुरार, विजय निळे, रवींद्र टेके, जितेंद्र टेके, प्रकाश मरळ, अतुल टेके, मधुकर सोनवणे, अशोक निळे, बापू वाकचौरे, रघुनाथ आहेर, भास्कर बोर्डे, रावसाहेब वाघ, सतीश गायकवाड, रावसाहेब जगताप, नितीन निकम, गोरख सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ, लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व मित्र परिवार, ग्रामस्थ, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र जाधव यांनी केले तर शंकर महाराज गोंडे यांनी आभार मानले.

Exit mobile version