Marathwada Sathi

शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या ‘गुप्त भेटीच्या’ चर्चा

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चक्क सांगलीतील शिवसेना जिल्हाध्यक्षांची भेट घेतली. आनंदराव पवार यांच्या कार्यालयाला भेट देत चंद्रकांतदादांनी गुप्त चर्चा केल्याची माहिती आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी जुळवाजुळव केल्याचे चित्र आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख उतरले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. चंद्रकांतदादा यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्याशी सोमवारी शिवसेना कार्यालयात गुप्तपणे चर्चा केली.सांगली जिल्ह्यामध्ये पदवीधरचे ८४ हजार १९१ मतदार आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांनी सांगली जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या विरोधकांची मोट बांधण्याचे ठरवले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आधी सदाभाऊ खोत यांची तलवार म्यान केली, आता शिवसेनेचे मतदार वळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.
इस्लामपूर नगरपालिकेतील भाजपचे पक्ष प्रतोद विक्रम पाटील यांनी या भेटीबद्दल दुजोरा दिला. इस्लामपूर नगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती असून, चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नामुळेच इस्लामपूर नगरपालिकेत आम्ही सत्तेत आहोत, असे विक्रम पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version