Marathwada Sathi

मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे, असा धमकीचा कॉल आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली. आरोपीने सोमवारी (१० एप्रिल) रात्री ११२ या हेल्पलाईनवर फोन करून धमकी दिली. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे आरोपी म्हणाला आणि त्याने फोन बंद केला. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात घेतले. राजेश मारूती आगवने (वय ४३) असे आरोपीचे नाव आहे. राजेश हा मुंबईतील धारावी परिसरात राहतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११२ या पोलीस हेल्पलाईनवर फोन आला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारणार असल्याचे फोनवर सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. धमकीचा कॉल पुणे शहरातील वारजे परिसरातून आल्याचे समोर आले. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले त्यावेळी आरोपी दारुच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले.

सोमवारी रात्री आरोपीने प्रथम ११२ वर फोन करून छातीत दुखत असून रुग्णवाहिका पाठवा, असे कळविले होते. त्यासाठी नियंत्रण कक्षातून १०८ ला कळवा असे सांगितल्यावर त्याने दुसऱ्यांदा त्याच क्रमांकावरून फोन केला. त्यावेळी आरोपीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवणार असल्याची धमकी दिली. पाोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले त्यावेळी तो दारूच्या नशेत होता.

आरोपी राजेश मारुती आगवणे वॉर्डबॉय म्हणून काम करतो. तो मुंबईतील धारावी परिसरात राहतो. त्याची पत्नी कोथरुडला खाजगी ठिकाणी काम करते. तिला भेटायला महिन्यातून दोन वेळा येतो. सोमवारी पत्नीला भेटायला आल्यावर त्याच्या छातीत दुखत होते. त्यावेळी त्याने ११२ वर फोन करून रुग्णवाहिका पाठवा असे सांगितले. त्यानंतर त्याला १०८ वर फोन करण्यास सांगितले पण त्याने पुन्हा ११२ वर फोन करून धमकी दिली.

Exit mobile version