Marathwada Sathi

१२ वर्षांनी “दादा” येणार मैदानात !

जगातील सर्वात मोठ्या सरदार पटेल स्टेडियमवर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये होणार सामना

अहमदाबाद : भारतीय क्रिकेट मध्ये ” दादा ” म्हणून ओळखला जाणारा सौरव गांगुली तब्बल १२ वर्षांनी अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमवर क्रिकेट खेळताना दिसणार आहे. गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यापासून त्याला पुन्हा एकदा क्रिकेट खेळताना बघण्याची फॅन्सना अपेक्षा असते. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) 24 डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. या बैठकीत भारतीय क्रिकेटसंबंधी अनेक मोठे निर्णय अपेक्षित आहेत. या निमित्तानं गांगुली पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.

“दादा ” का खेळणार क्रिकेट ?
अहमदाबाद येथे सरदार पटेल स्टेडियम हे नव्यानं बांधण्यात आले आहे. हे स्टेडियम 63 एकर जागेवर पसरलं आहे. यासाठी 750 कोटींचा खर्च आला आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 10 हजार इतकी असून हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे.
या स्टेडियमवर अजून एकही मॅच झालेली नाही. त्यामुळे येथील पिचचा अंदाज यावा यासाठी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात सौरव गांगुलीसह सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निरंजन शहा, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझहरुद्दीन देखील सहभागी होणार आहेत. टेनिस बॉलनं हा सामना होईल.

Exit mobile version