Marathwada Sathi

मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचा लाचखोर सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद : तक्रारदाराला त्याच्याच प्लॉटवर बांधकामाला विरोध करून मालकी हक्क सांगणाऱ्या शिवीगाळ करण्यात आली होती. त्या विरोध करणाऱ्या व्यक्तीच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति देण्याच्या बदल्यात रेडमी कंपनीचा १४ हजार ५०० रुपये किंमतीचा नोट ९ हा मोबाईल लाचेच्या स्वरूपात स्वीकारणाऱ्या सहायक फौजदाराला एसीबीच्या पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले. भास्कर रामजी खरात (५७, सहायक फौजदार, नेमणूक मुकुंदवाडी पोलिस ठाणे) असे लाचखोर अधिकाऱ्यांचे नाव आहे.

केश कर्तन व्यवसाय करणाऱ्या तक्रारदाराने स्वतःच्या प्लॉटवर बांधकाम केले होते. तेव्हा काही लोकांनी त्यांना शिवीगाळ करून बांधकाम करण्यास विरोध केला होता. तेव्हा तक्रारदाराने पोलिस आयुक्तांकडे विरोध करणाऱ्यांची तक्रार केली होती. त्याचा तपास करणारा लाचखोर सहायक फौजदार भास्कर खरात तेव्हा एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात कार्यरत होता. दरम्यान, गुरुवारी लाचखोर खरात यांच्याकडे तक्रारदाराने त्यांच्या प्लॉटवर मालकी हक्क सांगणाऱ्या व्यक्तीच्या कागदपत्राच्या साक्षांकित प्रति देण्यासाठी १४ हजार ५०० रुपये किंमतीचा एक नवीन रेडमी कंपनीचा मोबाइल लाच म्हणून मागितला. शुक्रवारी खरातने मोबाईल लाच म्हणून स्वीकारल्या नंतर एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. अनिता जमादार, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक गणेश ढोक्रट, शिपाई विजय बाम्हंदे, सुनील पाटील, अरुण उगले, मिलिंद इपर, चागंदेव बागुल यांनी केली.

Exit mobile version