Home इतर समृद्धी महामार्गाच्या कॅम्पमध्ये घुसला कोरोना !

समृद्धी महामार्गाच्या कॅम्पमध्ये घुसला कोरोना !

7
0

30 कामगारांना झाली लागण ; 265 पैकी 236 कामगारांचे नमुने घेतले

मराठवाडा साथी न्यूज
जालना :
कोरोनाचा प्रादुर्भाव जालना जिल्ह्यात अजूनही पसरतच असल्याचे कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येत आहे. दरम्यान, अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या मुंबई – नागपूर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कॅम्पमध्ये देखील आता कोरोना विषाणूने घुसखोरी केली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपर्यंत ( दि.2 ) समृध्दी महामार्गाच्या 30 कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या तीन – चार दिवसांपासून आरोग्य विभागाच्या पथकाने 236 जणांचे स्वॅब घेतले असून समृद्धीच्या व्यवस्थापन विभागाकडून 265 संशयित कामगारांची यादी आरोग्य विभागाकडे दिल्याचे सूत्रांनी सांगितले. असे असले तरी समृध्दी महामार्गावर काम करणाऱ्या कामगारांची संख्या 500 ते 600 च्या घरात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.


टाळेबंदी उठवल्यानंतर जालना जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार कमी झालेला दिसत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 905 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यापैकी 4 हजार 950 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेला असून आतापर्यंत 293 जनांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सर्वदूर पसरलेला असतानाच हा घातक विषाणू जालना शहाराजवळून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कॅम्पमध्ये जाऊन पोचला आहे. याबाबत येथील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समृद्धीचे काम घेतलेल्या कंत्रादार मॉंटो कार्लो कंपनीच्या निधोना शिवारातील कॅम्पमध्ये काम करणाऱ्या काही जणांना कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यानुसार आरोग्य विभागाच्या पथकामार्फत करण्यात आलेल्या चाचणीत पहिल्या दिवशी 14 जनांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले.दुसऱ्या दिवशी 8 जण आणि तिसऱ्या दिवशी 8 जण असे एकूण 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने या कॅम्पमध्ये जाऊन संशयित रुग्णांची तपासणी सुरू केली. कंपनी व्यवस्थापनाने आरोग्य पथकाला 265 जणांची यादी दिली.यापैकी 236 जनांचे स्वॅबचे नमुने आरोग्य विभागाने घेतलेले आहे. दरम्यान, येथील काही कामगार , कर्मचारी हे स्वॅब देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या कामावर या कंत्राटदार कंपनीने बाहेरून शेकडो कामगार आणलेले आहेत. याशिवाय काही कामगार हे स्थानिक परिसरातील असल्याचे येथील सूत्रांनी सांगितले. याबाबत मॉंटोकॉर्लो कंपनीचे इंचार्ज अनिलकुमार यांना अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा भ्रमणध्वनी संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता.

संशयितांना क्वारंटाईन केले – डॉ.शीतल सोनी
समृद्धी महामार्गाच्या 30 कामगारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने तेथे जाऊन 236 जनांचे स्वॅब घेतले आहेत. काहीजण स्वॅब देण्यास पुढे येत नाही.जे संशयीत रुग्ण आहेत, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून कोरोना बाधित रुग्णांना ठिकठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. आरोग्य विभागाकडून संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती जालना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शीतल सोनी यांनी दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here