Marathwada Sathi

काँग्रेसनेही “संभाजीनगर ” लिहावे – देवेंद्र फडणवीस

मुंबई: औरंगाबादच्या “संभाजीनगर “नामांतरवरून शिवसेना काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. त्यात मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवर औरंगाबादचा “संभाजीनगर ” असा उल्लेख करण्यात आला आहे. तर शासकीय व्यवहारातही संभाजीनगर नाव वापरण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे. तर राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयातही संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे”.यातूनच शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नामांतरणावरून मतभेद असल्याचे दिसून येते.

यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “येथे कोणतेच नियम अटी पाळल्या जात नाहीत. अवैधरित्या कशाला संभाजीनगर ठेवता, तुमच्याकडे संधी आहे. शासकीयरित्या संभाजीनगर नामकरण करून ते वापरा आणि काँग्रेसलाही त्याचा वापर करण्यास सांगा. तेव्हा तुम्ही काहीतरी करून दाखवले असा त्याचा अर्थ होईल.” अशी टीका फडणवीस यांनी मुंबई येथे “आत्मनिर्भर चहा”च्या उदघाटनावेळी पत्रकार परिषदेत केली.

Exit mobile version