Marathwada Sathi

रेणू शर्माविरोधात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना भेटणार – राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशउपाध्यक्षा कमलताई निंबाळकर

बीड
सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर कारवाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना बुधवारी (दि.२०) भेटणार असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमलताई निंबाळकर यांनी दिली.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर नुकतेच रेणू शर्मा या महिलेने गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. यातून मुंडे यांची मानहानी करण्याचा केविलवाणा प्रयत्न तिने केला. तिचा बोलविता धनी कोण, हे शोधून काढण्याची मागणी कमल निंबाळकर यांनी केली आहे. रेणू शर्माने यापूर्वी चौघांवर अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे तिचीच चौकशी करावी तसेच धनंजय मुंडे यांच्याविरुध्द खोट्या तक्रारी केल्याबद्दल तिच्यावर कारवाई करावी तसेच तिला महाराष्ट्रातून हद्दपार करावे, आदी मागण्यांसाठी बुधवारी (दि.२०) मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांनी सांगितले. धनंजय मुंडे हे विकासाभिमुख नेतृत्व आहे. त्यांनी परळीत नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब घरातील मुलींचे विवाह लावून दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचे घाणेरडे आरोप सहन केले जाणार नाहीत, असे कमलताई निंबाळकर म्हणाल्या.

Exit mobile version