Home मुंबई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांची जयंती गावागावात साजरी करा – ना. छगन भुजबळ

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांची जयंती गावागावात साजरी करा – ना. छगन भुजबळ

413
0

मुंबई
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात अधिक रुजविण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करत विविध सामाजिक कार्यक्रमातून प्रत्येक गावागावात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात यावी असे आवाहन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. छगन भुजबळ यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष बापू भुजबळ, प्रा.हरी नरके, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, ऍड सागर किल्लारीकर,मंगेश ससाने,कमलाकर दरोडे, पांडुरंग अभंग,ईश्वर बाळबुधे,बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे,अॅड.सुभाष राऊत, प्रित्येश गवळी, प्रा.दिवाकर गमे, प्रा.नागेश गवळी,रमेश बारस्कर,राज असरोडकार, प्रा कविता मेहेत्रे यांच्यासह राज्यभरातील समता सैनिक उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपुर्ण जीवन वेचले आहे. देशातील महिलांसाठी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर महिलांना शिकविण्यासाठी महात्मा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिकविले आणि शिक्षिका केले. त्या काळात सामाजिक बहिष्कार स्वीकारून प्रसंगी शेण व दगडधोंड्यांचा मार सहन करत त्यांनी मुलींना शिकविण्याचे ऐतिहासिक कार्य केले. स्त्रियांना शिक्षण मिळाल्याने चूल आणि मूल या परंपरेत चार भिंतीत अडकलेली महिला घराबाहेर पडली. त्याचा परिणाम म्हणजे आज महिला अनेक महत्वाच्या पदांवर काम करतांना आपण बघत आहोत. त्यामुळे महिला मुक्तीच्या शिल्पकार असलेल्या सावित्रीबाईंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन देशभर ‘ महिला शिक्षण दिन ‘ म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी राज्यशासनाकडे केलेली असून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच क्रांतीज्योती सावित्रीबाई यांची जयंती सावित्रीबाई फुले महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला २५ वर्षाचा टप्पा पूर्ण केला आहे. आजवर संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात संघटनेला यश मिळाले आहे. यापुढील काळातही संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या हिताच्या दृष्टीने आपल्याला काम करायचे आहे. त्यासाठी संघटना अधिक मजबूत करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. त्यामुळे समता सैनिकांनी सर्व बहुजन समाजातील बांधवाना या संघटनेशी जोडून महापुरुषांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचवावे तसेच आरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रा. हरी नरके म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी वयाच्या १७ व्या वर्षांपासून ते ७७ व्या वर्षांपर्यंत म्हणजे जवळपास ५० वर्ष सामाजिक कार्यात सातत्याने काम केलं. सातत्याने ५० वर्ष सामाजिक कार्य करणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. त्यांच्या विचारांचा वारसा आपण जपला पाहिजे. सद्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सुरू असलेली मालिका बंद होत आहे. ही मालिका बंद होऊ नये यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता असून त्यांचे सामाजिक विचार घराघरात पोहचावे यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र ओबीसीच्या ताटातील आरक्षण हिसकावून घेऊ नये यासाठी ओबीसी समाजात जनजागृती करण्यात यावी असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here