Home बीड नरभक्षक बिबट्याचा पारगाव शिवारात यंत्रणेस गुंगारा ?

नरभक्षक बिबट्याचा पारगाव शिवारात यंत्रणेस गुंगारा ?

164
0

सभोवतालच्या गावांना सतर्कतेचा इशारा, वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न: आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी शिवारात गेल्या चार दिवसात नरभक्षक बिबट्याने दोन महिलांवर हल्ले केले. गंभीर अवस्थेत एका महिलेवर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर यातील एका महिलेस प्राण गमवावे लगले. नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी वनविभागाचे राज्यभरातून तज्ञ पथकं पारगाव जोगेश्वरीत दाखल झाले आहेत. अद्ययावत यंत्राच्या साह्याने नरभक्षक बिबट्याची माग काढण्यात येत असला तरी मंगळवारी दि. 1 नरभक्षक बिबट्याने गुंगारा देत पारगाव शिवारातून दुसरीकडे मोर्चा वाळवल्याचा अंदाज शोत यंत्रणेकडून देण्यात आला आहे.

मराठवाडा साथी न्यूज
आष्टी : तालुक्यात नरभक्षक बिबट्याच्या धास्तीने नागरीकांच्या झोपा उडाल्या आहेत. मागील आठवडभरापासून तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी वन विभगाचे राज्यभरातील एक्सपर्ट पथक तालुक्यात तळ ठोकून आहेत. दोन दिवसापूर्वी एकाच दिवसात पारगाव जोश्वरी येथील शेतातून घरी परतनाऱ्या दोन महिलांवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये सुरेखा बळे- भोसले या महिलेस प्राण गमवावे लागले तर एका महिलेवर गंभीर अवस्थेत अहमदनर येथील रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. अद्ययावत यंत्र सामग्रीच्या साह्याने नरभक्षक बिबट्याचा माग काढून त्यास पिंजऱ्यात बंद करण्यासाठी नांदेड, यवतमाळ, चंद्रपुर यासह राज्यभरातील वन विभागाच्या पथकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना मंगळवारी (दि.1) पारगाव जोगेश्वरी शिवारातून बिबट्या पसार झाल्याचा अंदाज यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
तालुक्यात अवश्यकते नुसार पिंजरे लावून ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे नरभक्षक बिबट्याच्या हालचाली टिपण्यात येत होत्या. मात्र, गावखेड्यांचा शिवार पिंजून काढणाऱ्या वनविभागस बिबट्यास पकडण्यास अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात एकट्याने कामाला जाऊ नये, समुहाने शेती मशागतीची कामे करावीत, महिला, मुलांसह जेष्ट नागरीकांनी सतर्कता बळागावी, रान वस्त्यांवर फटाक्यांचा आवाज करावा, रात्रीच्या वेळेत वस्ती, गोठ्यांवर इलेक्ट्रिक दिव्यांचा प्रकाश वाढावा अशा सतर्कतेच्या सुचना वन विभागाकडून वारंवार देण्यात येत आहेत.
तालुक्यात गरजेनुसार ठिक ठिकाणी पिंजरे, ट्रॅप व ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी करण्यात येत असली तरी नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी रब्बीच्या उभ्या पिकांची अडचण निर्माण होत आहे. पारगावा जोगेश्वरी शिवारात गेल्या चार दिवसापासून वन विभागाची तपास यंत्रणा तळ ठोकून असताना मंगळवारी नरभक्षक बिबट्याने यंत्रणेला गुंगारा दिल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला. त्यामुळे सभोवतालच्या गावखेड्यांच्या नागरीकांना वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शेकडो कर्मचाऱ्यांचा राबता: पारगाव जोश्वरी येथील घटने नंतर वनविभागाच्या तपास यंत्रणेचे शेकडो कर्मचारी सतर्क झाले होते. परिसरात पिंजरे लावून त्यामध्ये ट्रांक्युलयझर टीम चे शूटर बसविण्यात आले होते. बिबट्यासाठीचे भक्ष पिंजऱ्या बाहेर ठेऊन त्याला बेशुद्ध करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत होती. बिबट्याला चकविण्यासाठी मनुष्याचे बाहुल्या तयार करून विविध ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या.मात्र या सर्व उपाय योजनांना नरभक्षक बिबट्याने गुंगारा दिला आहे.

नरभक्षक बिबट्याने तीसऱ्या दिवशी वळवला मोर्चा
घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा बिबटया जवळच्या ओढ्यावर आला असल्याचे ठसे वन विभागाला आढळून आले .तसेच या भागात परत आल्याचे अनेकांनी पाहिले. मात्र तिसऱ्या दिवशी याचा कुठलाही मागमूस आढळून आला नाही. त्यामुळे एकूणच या बिबट्याने या भागातील रहिवास बदलला असावा असा कयास आहे.आजूबाजूच्या गावात आणि पारगावमध्ये लाऊडस्पीकरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. पारगाव, बळेवाडी, जामगाव, वाळुंज, खडकत, डोनगाव या गावांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here