Marathwada Sathi

‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ विरोधात गुन्हा दाखल…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली :फेसबुक डाटा चोरी प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभाग सांभाळत आहे.केंद्रीय अन्वेषण विभागाकडून युनायटेड किंगडमच्या ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५.६२ लाख भारतीयांचा फेसबुक युझर्सचा डाटा चोरी करण्याच्या आरोपासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान,केंद्रीय अन्वेषण विभागाने याच प्रकरणात युनायटेड किंगडमची आणखी एक कंपनी ‘ग्लोबल सायन्स रिसर्च’ विरोधातही कारवाई सुरू केलीय.

यासांदर्भात अधिक माहिती देत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे की,फेसबुक – केम्ब्रिज अॅनालिटिका डाटा चोरी प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभाग करणार आहे.

तसेच ‘ग्लोबल सायन्स रिसर्च’ने अवैध पद्धतीने ५.६२ लाख भारतीय फेसबुक युझर्सचा डाटा मिळवून तो ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’सोबत शेअर केला. ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’कडून या डाटाचा वापर भारतात होणाऱ्या निवडणुकांना प्रभावित करण्यासाठी करण्यात आला, असा आरोप केला जातोय.

दरम्यान,फेसबुकच्या म्हणण्यानुसार, ५ एप्रिल २०१८ रोजी केम्ब्रिज अॅनालिटिकानं इन्स्टॉल केलेल्या अॅपद्वारे जवळपास ५ लाख ६२ हजार ४५५ भारतीयांचा फेसबुक डाटा मिळवला होता. आता,या प्रकरणाची सूत्र सीबीआयने आपल्या हातात घेतली आहेत.

Exit mobile version