Marathwada Sathi

पोलिसांवर भाजपचा इतका…..

मुंबई: पवई पोलीस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीवरून राजकारण तापण्याची चिन्हं आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेनं या मुद्द्यावरून भाजपला घेरलं आहे. ‘भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का?,’ असा खोचक टोला युवा सेनेनं हाणला आहे. पवई हिरानंदानी येथील गॅलरिया मॉलजवळ दोन दिवसांपूर्वी एका महिला डॉक्टरच्या गाडीला भाजपचे कार्यकर्ते धडकले होते. नियमांचं उल्लंघन करत हे तीन कार्यकर्ते बाइकवरून प्रवास करत होते. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले व रिक्षातून पोलीस ठाण्यात नेले. मात्र, रिक्षातून जाताना या तिघांनी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर भाजपचे आमदार
राम कदम यांनी फोन करून आरोपींना सोडण्याची विनंती केली होती. या घटनाक्रमावरून युवा सेनेनं भाजपवर तोफ डागली आहे.
‘मुंबई पोलिसांना आधी शिव्या आणि आता तर भाजप कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला केला. भाजपचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का आहे?,’ असा प्रश्न युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. ‘ह्या घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे. या सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. जेणेकरून पोलिसांवर हात टाकण्याची पुन्हा कोणाची हिंमत होता कामा नये,’ असंही त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे

Exit mobile version