Marathwada Sathi

‘२०१९ च्या निवडणुकीत भाजपची ‘बी टीम’ …..!

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई :
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘२०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपची ‘बी टीम’ म्हणून कोण काम करत होतं हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे,’ असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी काल काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली होती. ‘शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका ही नौटंकी आहे. सगळा दोष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला देण्यात अर्थ नाही. ते दोषी आहेतच पण या सगळ्याची सुरुवात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंच केली होती. यांनीच २००६ साली कंत्राटी शेतीचा कायदा आणला होता. त्यांचीच भूमिका मोदी सरकार पुढं नेतंय. हे दोन्ही पक्ष भाजपची ‘बी टीम’ आहेत,’ असं आंबेडकर काल म्हणाले होते.आंबेडकरांच्या या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी उत्तर दिलंय. ‘शरद पवार साहेब देशाचे कृषिमंत्री असताना त्यांनी कृषी मालाचे हमीभाव दुप्पट केले. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून कृषी माल खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ केली. त्यामुळं देशातील शेतकरी हा खऱ्या अर्थाने सुखी व सधन झाला. पवार साहेबांच्या कृषी धोरणांना साथ देत देशातील शेतकऱ्यांनी कृषी मालाचे विक्रमी उत्पादन केले आणि पहिल्यांदा देश अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला. संयुक्त राष्ट्राच्या फूड अँड अग्रिकल्चर ऑर्गनायजेशन देखील याची दखल घेतली. अनेक पुरस्कारही भारत सरकारला मिळाले याचा विसर आंबेडकर यांना पडला असावा,’ असं तपासे म्हणाले.

Exit mobile version