Home औरंगाबाद औरंगाबाद महानगरपालिकेला मोठा फटका…!

औरंगाबाद महानगरपालिकेला मोठा फटका…!

722
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : औरंगाबाद मधील महापालिकेचे सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय बंद आहे. त्यामुळे महापालिकेचे आतापर्यंत सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती मिळाली आहे. दुसरीकडे प्राण्यांचे अन्न, इतर खर्च व देखभाल दुरुस्तीचा बोजा पालिकेवर पडला आहे. या प्राणिसंग्रहालयाला वर्षभरात सुमारे सहा लाख नागरिक भेट देतात.

सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय हे औरंगाबादकरांसाठी अभिमानाचा, तर पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पिवळे पट्टेदार वाघ आणि पांढरे वाघ हे या प्राणिसंग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय हरणांचा कळप, बिबट्यांची जोडी, नील गायी, विविध प्रकारचे पक्षी आणि सुमारे शंभर साप येथे पाहण्यास मिळतात. याशिवाय अन्य छोटे, मोठे प्राणी सुद्धा प्राणिसंग्रहालयाचे महत्त्वाचे घटक बनले आहेत. सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय संपूर्ण मराठवाड्यात एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून कामानिमित्त औरंगाबादेत आलेले नागरिक वेळात वेळ काढून प्राणिसंग्रहालयाला भेट देतात.

कोरोना संसर्गामुळे महापालिकेने १६ मार्च पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी प्राणिसंग्रहालय बंद ठेवले आहे. यासह सिद्धार्थ उद्यानही नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. नऊ महिन्यांपासून प्राणिसंग्रहालय बंद आहे. शिवाय केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने अद्याप प्राणिसंग्रहालय सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे प्राणिसंग्रहालय केव्हा सुरू होईल याबद्दल अधिकाऱ्यांना ठोस सांगता येत नाही. प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरात सुमारे सहा लाख नागरिक प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. त्यातून सव्वाकोटींच्या आसपास उत्पन्न मिळते. नऊ महिन्यापासून प्राणिसंग्रहालय बंद असल्यामुळे आतापर्यंत एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्राणिसंग्रहालयाचे उत्पन्न वाढावे व त्यातून प्राणिसंग्रहालयाची देखभाल दुरुस्ती करावी या उद्देशाने पालिकेने चार वर्षांपूर्वी तिकीट वीस रुपयांवरून पन्नास रुपये केले होते. त्याचा लाभ पालिकेला झाला, पण सध्या ते बंद असल्याने एकीकडे नुकसान सहन करावे लागत आहे, तर दुसरीकडे प्राण्यांचे अन्न, इतर खर्च व देखभाल दुरुस्तीचा बोजा पालिकेवर पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here