Marathwada Sathi

काळजी घ्या! ४० दिवसांत महाराष्ट्रात उष्माघाताचे ३५७ रुग्ण

मुंबईः महाराष्ट्रासह संपूर्ण देशात तापमानाचा पारा वाढत आहे. उष्मा वाढत असल्याने राज्यातील नागरिकांचे आरोग्यही बिघडले ही. राज्यात ३५७ उष्माघाताचे संशयित रुग्ण आढळले आहे. तर, एक रुग्णांचे निदान झाले आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत मुंबई उपनगरात ७२ संशयित रुग्ण आढळले आहेत. तर, नंदूरबारमध्ये ६४ तर यवतमाळमध्ये ४६ उष्माघाताचे रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने गुरुवारी जारी केलेल्या अहवालानुसार ही आकडेवारी समोर आली आहे.

साताऱ्यात उष्माघाताचा एक रुग्ण आढळला आहे. तर, पुणे जिल्ह्यात दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या तापमानामुळं नागरिकांना हा त्रास सुरु झाल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. बुधवारी राज्यातील २२ ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशाचा पार गेला होता. तर, गुरुवारी राज्यातील आठ ठिकाणी ४० अंशापर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली होती. तर, विदर्भातील चंद्रपूर येथे दिवसाचे तापमान ४३.२ अंश इतके नोंदवले गेले होते.हवामान विभागाने जारी केलेल्या हवामान अंदाजाननुसार, पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील कमाल तापमानाचा पारा १ -२ अंशापर्यंत वाढू शकतो. त्यानंतर २-३ अंशापर्यंत हळूहळू तापमानात घसरण होऊ शकते.

वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळं उष्माघात होऊ शकतो. उष्माघाताच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डिहायड्रेशन, चक्कर येणे, पुरळ येणे असं आढळते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. तसंच, यामध्ये शरीराचे तापमान १०६ फॅरेनहाइटच्यावर वाढते. अशावेळी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे जेणेकरुन शरीर हायड्रेटेड राहील. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळा. तसंच, घराबाहेर पडताना पूर्ण बाह्याचे कपडे आणि डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी घालावी, असं डॉ. अंबाडेकर यांनी म्हटलं आहे.राज्यात उष्माघातामुळं आत्तापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. गेल्या उन्हाळ्यात उष्माघातामुळं ३१ जणांचा मृत्यू झाला होता. ही आकडेवारी २०१५नंतर सर्वाधिक होती. या उन्हाळ्यात आत्तापर्यंत एकूण संशयित रुग्णांपैकी २६८ रुग्ण मार्चमध्ये नोंदवले गेले आहेत, असं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

६५ वर्षांवरील नागरिक, ५ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले, गर्भवती महिला, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार असलेल्यांना उष्माघाताचा धोका अधिक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. उष्माघात किंवा उष्णतेशी संबंधित आजारांची लक्षणे सहसा उन्हाळ्याच्या दिवसांत वाढतात. त्यासाठी. प्राथमिक खबरदारीचा उपाय म्हणजे भरपूर पाणी आणि ज्यूस पिणे. लोकांनी चक्कर आल्यास किंवा डिहायड्रेशन झाल्यास कामातून काहीवेळ ब्रेक घ्यावा, असं नोबल रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. एच. के सेल यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version