Home अर्थकारण बँकांनी पुकारला संप …..

बँकांनी पुकारला संप …..

213
0

मराठवाडसाथी न्युज
नवी दिल्ली : बँकांनी पुकारला संप महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमुळे २१ ऑक्टोबर रोजी आलेली सुट्टी, २२ ऑक्टोबर रोजी बँकांनी पुकारलेला संप, चौथ्या शनिवारची सुट्टी आणि पुन्हा रविवारची सुट्टी यामुळे राज्यात चार दिवस बँका बंद राहणार असून केवळ तीन दिवसच बँकांचं कामकाज सुरू राहणार असल्याने बँकांची महत्त्वाची कामे उरलेल्या तीन दिवसात उरकून टाका.महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये २१ ऑक्टोबर रोजी मतदानाची सुट्टी असल्याने या दोन राज्यात बँका बंद राहणार आहेत. इतर राज्यात २१ ऑक्टोबर रोजी बँक सुरू राहिल. रिझर्व्ह बँकेनेही महाराष्ट्र आणि हरयाणात मतदानाच्या दिवशी बँका बंद ठेवण्याच्या सूचना केल्या असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. मात्र, हरयाणा आणि पंजाबची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये सोमवारी बँका सुरू राहणार आहेत.
त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी मंगळवारी ऑल इंडिया एम्प्लॉइज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाने एक दिवसाचा संप पुकारला आहे. हा संप यशस्वी झाल्यास मंगळवारी बँकांचे व्यवहार ठप्प होतील. मात्र, २३, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी देशभरातील बँकांचं कामकाज सुरळीत सुरू राहणार आहे. शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार आहे. त्यामुळे त्या दिवशी बँक बंद राहिल. तर २७ ऑक्टोबर रोजी रविवार आणि दिवाळी असल्याने त्या दिवशीही बँक बंद राहणार आहे. म्हणजे या आठवड्यात महाराष्ट्र आणि हरयाणात एकूण चार दिवस बँका बंद राहणार आहेत.
सरकारी बँकांच्या दोन संघटनांनी ऐन दिवाळीपूर्वी, २२ ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए) व बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) या बँक कर्मचारी संघटनांनी या संपाचे आवाहन केले आहे. सरकारी बँकांच्या विलीनीकरणाचा व मुदत ठेवींवरील घटत्या व्याजदराचा निषेध करण्यासाठी संप पुकारत असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. मात्र उर्वरित सात संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला नसल्याने बँकांच्या कामकाजावर फार परिणाम होणार नाही, अशी शक्यता आहे. या सात कर्मचारी संघटनांमध्ये तीन संघटना या कर्मचाऱ्यांच्या तर, चार संघटना अधिकाऱ्यांच्या आहेत. एआयबीईए आणि बीईएफआय या संघटनांत आमच्या बँकेचे फार कमी कर्मचारी असल्याने या संपाचा आमच्या बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार नाही, असे स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बँक अधिकाऱ्यांच्या संघटनेने गेल्या महिन्यात २६ व २७ तारखेला संपाची हाक दिली होती. मात्र सरकारच्या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here