Marathwada Sathi

रिक्षाचालकाने नकार देताच छातीत चाकू खुपसला

औरंगाबाद : जळणासाठी लाकडे गोळा करणाऱ्या रिक्षाचालकाने एकाला बायजीपुऱ्यात सोडण्यास नकार देताच त्याच्या छातीत चाकू मारून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास आझाद चौकात घडली. शेख अयाज शेख अहेमद (२५, रा. नारेगांव) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव असून हल्लेखोर फरहान फारुख शेख (३०, रा. बायजीपुरा) याला जिन्सी पोलिसांनी अटक केली असून त्याची न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली असल्याचे निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी सांगितले. रिक्षाचालक शेख अयाज हे गुरुवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास आझाद चौकातील अरमान फर्नीचर या दुकाना समोर निरउपयोगी लाकडे घरी जळणासाठी घेऊन जायचे म्हणून ते गोळा करीत होते. त्यावेळी तिथे आरोपी फरहान आला. त्याने रिक्षाचालक अयाज यांना म्हणाला की, ” बायजीपुरा कहा है, मुझे तेरे रिक्षा से बायजीपुरा छोड़ दे ” तेव्हा अयाज यांना घरी जाण्यासाठी उशीर होत असल्याने त्यांनी त्याला रिक्षाने बायजीपुरा येथे सोडण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या फरहानने रिक्षाचालक अयाज यांना शिवीगाळ करुन त्यांच्या छातीत चाकु मारुन गंभीर जखमी केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचे मेव्हणे शेख शाहरुख शेख युसूफ यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी शेख फरहान याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मयेकर हे करत आहेत. 

Exit mobile version