मराठवाडा साथी न्यूज
ग्राम पंचायत निवडणुकीत विजय झाल्यामुळे आनंदाच्या प्रित्यर्थ मित्रांना जेवण देणाऱ्यास वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे हॉटेल चालक बाप लेकांनी जातिवाचक शिवीगाळ करत चाकूने जीव घेणा हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली आहे . या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे. हे वृत्त समजताच वैजापूर पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमा झाला होता.
या विषयी अधिक माहिती अशी कि , नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुबाई बागुल यांना बहुमताने विजय मिळाला म्हणून मित्रांनी आग्रह केल्यामुळे अमोल बागुल यांनी आपल्या मित्रांना खंडाळा येथील हॉटल राजधानी येथे जेवणास निमंत्रित केले होते. दरम्यान मित्रांसोबत संध्याकाळी साडे सहा वाजता जेवण केल्यानंतर बिल देत असताना तंदूरचे बिल जास्त लागल्याबद्दल अमोल यांनी विचारणा केली असता हॉटेल मालक अरुण शिंदे व ऋषिकेश शिंदे या पिता पुत्रांनी अमोल बागुल याला जातिवाचक शिवीगाळ करून चाकूने जीवे मारण्याच्या उद्देशाने सपासप वार करत डाव्या बाजूच्या हातास,पायास व कानास चाकूने वार केल्याने अमोल बागुल हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर सोबतच्या मित्रांनी त्यांना गावातील खाजगी दवाखान्यात नेले असता रक्तप्रवाह थांबत नसल्याने त्यांना डॉक्टरांनी त्यांना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले त्यानुसार त्यांचे भाऊ भाऊ मिलिंद बागुल यांनी जखमी अमोल बागुल यांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले.
दरम्यान सदरील घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित,पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत व पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेतले व पोलीस ठाणे वैजापूर येथे हजर केले.यावेळी वैजापूर पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव गोळा झाला होता.
यारकरणी जखमी अमोल बागुल यांनी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना दिलेल्या जवाबाच्या आधारे आरोपीविरुद्ध कलम 307,326,34 भादवीसह कलम 3(1)(R)(s),3(2)(Va) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती जात प्रबंधक कायद्यानुसार आरोपी अरुण शिंदे व मुलगा ऋषिकेश शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे करत आहे.