Marathwada Sathi

औरंगाबाद : सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे बहिणींवरील संकट टळले

औरंगाबाद : घरातून काही न सांगता निघून गेलेल्या बहिणींना सातारा पोलिसांनी नाशिक येथून चोवीस तासाच्या आत मोबाईल लोकेशनवरून शोध घेत सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन केले. सोळा आणि अठरा वर्ष वय असलेल्या या बहिणींवरील संकट सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले.
सातारा परिसरात राहणारे शेतकरी यांच्या दोन मुली या १९ जानेवारी रोजी सकाळी कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत पालकांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र, त्या मिळून आल्या नाही. त्यामुळे पालकांनी सायंकाळी सातारा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यातील एक मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर सर्व प्रकार सातारा ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्यासमोर पालकांनी कथन केला. आजूबाजूला घडणाऱ्या वाईट घटनांमुळे पालक चिंताग्रस्त झालेले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक माळाळे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. यातील एका मुलीकडील मोबाईल क्रमांक सायबर पोलिसांना पाठवून लोकेशन मागविले. त्यानुसार या दोघी बहिणी नाशिक येथे असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह एक पथक नाशिकला तात्काळ रवाना केले. काही तासात पथकाने त्या बहिणींना लोकेशनवरून शोध घेत ताब्यात घेतले. दोघीही मध्यरात्री नाशिकमधील सातपूर भागात एकाजागी बसलेल्या होत्या. सातारा पोलिसांचे पथक दोघी बहिणींना सोबत घेऊन औरंगाबादकडे आले. दोघींना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. मुली सुखरूप परत आल्याने पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी सातारा पोलिसांचे आभार व्यक्त केले.

पालकांचे केले समुपदेशन

वडिलांना रोजगार नसल्याने ते व्यसनाच्या आहारी गेले. आई मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवत आहे. घरात रोज छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू असायच्या. या सर्व गोष्टींना कंटाळून दोघी बहिणी एसटीने मध्यवर्ती बसस्थानकातून नाशिकला गेल्या. तिथे गेल्यावर त्या सातपूर भागात एका ठिकाणी थांबल्या. रात्र झाली तरी कुठे जावे या विचारात त्या एकाच जागी बसून राहिल्या. मात्र, सातारा पोलिसांनी १९ जानेवारीच्या मध्यरात्री दोघी बहिणींना सुखरूप घरी आणले. आई- वडिलांचे समुपदेशन केल्याचे सातारा ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले.

Exit mobile version