Marathwada Sathi

अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून वाहिली इंदिरा गांधी यांना आदरांजली

मुंबई : देशाची एकता… अखंडता… सार्वभौमता कायम राखत देशाला ‘महासत्ता’ बनण्याच्या वाटेवर आणण्यात स्वर्गीय इंदिराजींचे नेतृत्व…कर्तृत्व… त्याग… बलिदानाचे योगदान सर्वाधिक आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन कृतज्ञता व्यक्त केली. माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात व स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत इंदिराजी व गांधी-नेहरु घराण्याने दिलेले योगदान, केलेल्या त्यागाबद्दल देशवासीय त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञ राहतील. इंदिराजींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. तुरुंगवास भोगला. पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासाचा पाया भक्कम केला.
पाकिस्तानची फाळणी करुन स्वतंत्र बांग्लादेशची निर्मिती हे त्यांची दूरदृष्टी, राजकीय कौशल्य, साहसी नेतृत्वाचे आगळेवेगळे उदाहरण आहे. आशियाई खेळांचे आयोजन असो की, अलिप्त राष्ट्रांचे नेतृत्व करण्याची क्षमता, इंदिराजींच्या अनेक निर्णयांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा गौरव वाढवला. देशाच्या एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी प्राणांचे बलिदान करणाऱ्या सर्वकालिन महान नेतृत्वास कृतज्ञतापूर्वक अभिवादन अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.

Exit mobile version