Marathwada Sathi

“अजिंक्य टीम “च्या कर्णधाराचे जंगी स्वागत

मुंबई : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला गाबाच्या मैदानावर पराभूत करत ऐतिहासिक विजय प्राप्त केला. भारतीय संघाने शुबमन गिल, ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने ३२८ धावांचे आव्हान पार केले. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ३२ वर्षांपासून अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताच्या अजिंक्यने धूळ चारली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकत पराक्रम केला. त्यानंतर अजिंक्य भारतात परतल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशाचा गजर आणि रेड कार्पेट अशा थाटात त्याचे सर्वांनी स्वागत केले.

मालिका विजयानंतर अजिंक्य मुंबईत परतला आणि त्याचे स्वागत दणक्यात झाले. मुंबईच्या रूपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट हांथरून ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांहून अधिक काळ लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यने मुलीला कडेवर घेतच जंगी स्वागताचा स्वीकार केला. सोबत अजिंक्यची पत्नीदेखील होती. ढोल ताशांच्या गजरात अजिंक्यचं स्वागत करण्यात आलं.

Exit mobile version