Marathwada Sathi

गुंतवणूकदारांच्या तोट्यात दिवसेंदिवस वाढच तरीही कंपनीच्या नावे अनोखा विक्रम

मुंबई : येस बँकेच्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. येस बँक ही ५० लाखांहून अधिक भागधारक असलेली पहिली भारतीय कंपनी ठरली असून ही माहिती मार्च महिन्यातील आकडेवारीनुसार समोर आली आहे. यानंतर टाटा समूहातील टाटा पॉवर दुसऱ्या क्रमांकावर असून कंपनीच्या एकूण भागधारकांची संख्या ३८.५ लाख आहे. याशिवाय या यादीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज तिसऱ्या क्रमांकावर एकूण भागधारक ३३.६ लाख आहे. विशेष म्हणजे टाटा पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांची संख्या डिसेंबरच्या तिमाहीनुसार आहे.

एका अहवालानुसार, डिसेंबर तिमाहीच्या शेवटी येस बँकेच्या एकूण भागधारकांची संख्या ४८.१ लाख होती, जी आता वाढून ५०.६ लाख कोटी इतकी झाली आहे. विशेष म्हणजे येस बँकेचे सर्व भागधारक ‘पब्लिक’ आहेत.दरम्यान, येस बँकेचे शेअर्स काल गुरुवार, १३ एप्रिल रोजी एनएसईवर ०.९७% घसरून १५.२५ रुपयांवर बंद झाले. तसेच गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये १.९३% ने घसरण पाहायाला मिळाली असून गेल्या एका वर्षात बँकेच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना ८.१६% परतावा दिला आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात येस बँकेचे शेअर्स २४.८ रुपयांची सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते तर सध्या, बँकेचे शेअर्स या सार्वकालिक उच्चांकापेक्षा सुमारे ३८% घसरून व्यवहार करत आहेत. अशा प्रकारे गुंतवणूकदारांच्या तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येस बँकेचा गेल्या ५२ आठवड्यांचा नीचांक १२.२ रुपये आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) लागू केलेल्या तीन वर्षाच्या लॉक-इन कालावधीच्या समाप्तीनंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये अलीकडेच घसरण सुरु झाली. येस बँकेचा लॉक-इन कालावधी १३ मार्च रोजी संपला. यानंतर शेअर्समध्ये सतत विक्रीचे सत्र सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.

तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२० मध्ये येस बँकेला बुडण्यापासून वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक पुनर्रचना योजना तयार केली होती, ज्या अंतर्गत बँकेच्या सर्व गुंतवणूकदारांना मार्च २०२३ पर्यंत त्यांचे शेअरहोल्डिंग विकण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, आता हा लॉक-इन कालावधी संपला, त्यामुळे गुंतवणूकदार शेअर्स विकत आहेत.

Exit mobile version