Marathwada Sathi

महिलेच्या पोटात तब्बल १० किलोचा गोळा

नांदेड : आरोग्यासंबंधी अनेक विचित्र घटना समोर येत असतात. डॉक्टरांनीही अतिशय अनोख्या शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्याच्या अनेक घटना आपण वाचल्या असतील. असाच एक अजब प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून यामध्ये असं काही समोर आलं की संपूर्ण आरोग्य क्षेत्रात यामुळे खळबळ उडाली आहे.

बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील कल्पना दमयावर या महिलेला पोट दुखीचा नेहमी त्रास होत होता. पोट देखील सुटले होते. मागील काही दिवसांपासून पोट दुखीचा त्रास असल्याने नातेवाईकांनी त्या महिलेला गोवर्धन घाट रोडवरील तोटावार हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल केलं आणि यानंतर जे काही समोर आलं त्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.

सोनोग्राफी केल्यानंतर महिलेच्या पोटात गाठ असल्याचे डॉक्टरांना निदर्शनास आले. हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. आशा तोटावार यांनी नातेवाईकांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर महिला डॉक्टरांने २ तास यशस्वी शस्त्रक्रिया केली. यानंतर त्यांनी पाहिलं की महिलेच्या पोटात तब्बल १० किलोचा गोळा तयार झाला होता. २ तासाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ३५ वर्षीय कल्पना यांच्या पोटातून हा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आलं.

सुरुवातीला महिलेच्या उजव्या अंडाशयावर गाठ तयार झाली होती. त्यानंतर हळू हळू ही गाठ मोठी झाली आणि पोटात गोळा तयार झाला. अंडाशयाचा चक्क १० किलोचा गोळा काढून डॉक्टरांनी संबंधित महिलेचे प्राण वाचले. सध्या त्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून यामुळे कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला होता.

विषाणू संसर्गाने व शरीरातील इतर विकारांमुळे बालवयापासून ते वृद्धत्वापर्यंतच्या अवस्थेत महिलांना पोटात गाठी (ओव्हेरियन ट्युमर) हा आजार होऊ शकतो. अशा गाठी अंडाशय, गर्भाशय व आतड्यात होऊ शकतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना पोटदुखीचा त्रास होतो अथवा काहीच त्रास होत नाही. उलट्या होणे, पोटातील गाठीला पीळ पडल्यास ताप येणे, अतिरक्तस्त्राव आदी त्रासाची लक्षणे दिसतात.

यामुळे अशा गाठींकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने या गाठीचे कर्करोगात रूपांतर होऊ शकते. त्याचबरोबर पोटातील गाठ फुटून रक्तस्त्राव होऊन रुग्णाच्या जीवितास धोका होऊ शकतो. पोटात गाठ (ओव्हेरियन ट्युमर) झाल्याचे निदान झाल्यास अथवा तशी लक्षणे आढळल्यास महिलांनी दुर्लक्ष न करता योग्य त्या तपासण्या करून वेळेवर उपचार घ्यावेत. तसे केल्यास पुढे होणारे धोके टळू शकतात, अशा सूचना डॉक्टरांकडून देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version