Marathwada Sathi

येत्या १० ते १२ दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : दिवाळीच्या काळात सर्वजण आनंदात होते. त्यामुळे कोरोनाकडे थोडेफार दुर्लक्ष झाले. परंतु आता दिवाळी संपली आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर भागाचीही कोरोना संदर्भातील परिस्थिती काय आहे? हे पाहून पुन्हा लॉकडाऊन लागू करायचा, की नाही यावर परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सध्या तरी लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 
पुणे पदवीधर विभाग मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे मला अधिकाऱ्यांची बैठक घेता आली नाही. त्यामुळे एक 1 डिसेंबर रोजी अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. तोपर्यंतच्या या पाच सहा दिवसात राज्यातील कोरोना संदर्भातील चित्रही स्पष्ट होईल.
राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात एक नियमावली तयार केली आहे. ज्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. शाळांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियम घालून देण्यात आले आहेत. शाळा सुरू करायचा की नाही यासंदर्भात महापालिका आणि जिल्हा परिषदा निर्णय घेऊ शकतात. 

शरद पवारांबद्दल बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, साहेबांबद्दल बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. समाजात ज्यांना कवडीचीही किंमत नाही ते खालच्या पातळीवर जाऊन बडबड करतात. अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांनी आपली उंची बघून तरी बोलावं, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला.


Exit mobile version