Marathwada Sathi

४४ कोटींची लॉटरी जिंकली, पण कॉल करणाऱ्याला फेक समजून केलं ब्लॉक

आजकाल ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच कोणत्याही अनोळखी कॉलरचा कॉल आल्यास तो जणू काही आपली फसवणूकच करणार आहे, अशी भीती लोकांच्या मनात असते. विशेषतः जेव्हा समोरून कॉल करणारी व्यक्ती पैशाबद्दल बोलते. बंगळुरूचे रहिवासी अरुण कुमार वाटके कोरोथ यांच्या वाट्यालाही तोच अनुभव आला. अबू धाबीच्या बिग तिकीट ड्रॉमध्ये ४४ कोटी रुपये जिंकल्याची बातमी त्यांना फोनवरून देण्यात आली. परंतु त्यांनी केवळ फोनच डिस्कनेक्ट केला नाही तर हा फेक कॉल असल्याचे समजून तो नंबर ब्लॉक करून टाकला. बिग तिकीट ड्राच्या लॉटरीवाल्यांनी दुसर्‍या क्रमांकावरून कॉल केला आणि त्यांना मोठ्या कष्टाने पटवून दिले की, ते खरोखरच करोडपती झाले आहेत आणि अबू धाबीमधील बिग तिकीट सोडतीचे पहिले पारितोषिक विजेता ठरले आहेत.

अरुण कुमार यांनी खलीज टाईम्सला सांगितले की, ‘जेव्हा मला बिग तिकीटकडून कॉल आला, तेव्हा मला वाटले की, हा फेक कॉल आहे किंवा कोणीतरी मस्करी करीत आहे. मी फोन डिस्कनेक्ट केला आणि तो नंबर ब्लॉक केला. थोड्या वेळाने मला एका वेगळ्या नंबरवरून कॉल आला की मी लॉटरीमध्ये ४४ कोटी रुपये जिंकले आहेत, असं सांगितले गेले. मग तेव्हाच माझा विश्वास बसला.

अरुणला त्याच्या एका मित्राकडून बिग तिकीट सोडतीची माहिती मिळाली. त्यांनी घरी बसून ऑनलाइन लॉटरीचे तिकीट घेतले होते. २२ मार्च रोजी अरुणने बिग तिकीट लॉटरी क्रमांक २६१०३१ राफेल तिकीट ऑनलाइन खरेदी केले. त्यांनी लॉटरीचे तिकीट खरेदी करण्याची ही दुसरी वेळ होती. परंतु त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे नशीब पालटले आणि ते करोडपती झाले. त्यांना पहिले बक्षीस म्हणून ४४ कोटी रुपये मिळणार आहेत. लॉटरीतून मिळालेल्या पैशातून व्यवसायात नशीब आजमावणार असल्याचे अरुण सांगतात.अबु धाबी येथे झालेल्या या लॉटरीचे दुसरे पारितोषिकही एका भारतीयाने जिंकले आहे. तो सध्या बहारीनमध्ये राहत आहे. अबु धाबीच्या बिग तिकीट लॉटरीचे दुसरे पारितोषिक जिंकणाऱ्या सुरेश माथनने लॉटरीत २२ लाख रुपये जिंकले आहेत.

Exit mobile version