Home इतर आता कोठे आहेत आनंदीबाई !

आता कोठे आहेत आनंदीबाई !

260
0

मराठवाडा साथी न्यूज

वैजापूर । वैजापूर व मराठवाड्याच्या राजकारणात, समाजकारणात स्त्रियांचा राजकारणात नाममात्र सहभाग असताना एकेकाळी शेतकरी संघटना व नंतर शिवसेनेच्या मुलुख मैदानी तोफ व सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आईसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदीबाई अन्नदाते आज कुठे आहेत ? असा प्रश्न अनेक शिवसेनेच्या कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती जाणवल्यावर विचारला जातो. दिल्लीच्या बोट क्लब व शेतकरी संघटना व उत्तर प्रदेशचे शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकैत यांच्या ऐतिहासिक संयुक्त शेतकरी सभेत व्यासपीठावर दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा पुढे होत आपले नेते शेतकरी संघटनेचे प्रमुख शरद जोशी यांच्या संरक्षणासाठी आनंदीबाई पुढे आल्या आणि टिकैत यांच्या अंगरक्षकाची बंदूक हिसकावून ती टिकैत यांच्यावरच रोखली. तेव्हा देशातील सर्व वर्तमानपत्रात झाशीची राणी म्हणून आनंदी अन्नदाते यांचा उल्लेख केला. शरद जोशी यांच्या मानस कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदी अन्नदाते या पुढे शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या. एक महिला एका मोठ्या पक्ष व संघटनेची प्रदेशाध्यक्ष होण्याची ही राज्यात पहिलीच वेळ होती. पुढे अनेक शेतकरी आंदोलनात आनंदी अन्नदाते यांनी रस्त्यावर उतरून लाठ्या-काठ्या खाल्ल्या. कांदा आंदोलनात येरवडा येथे दोन महिन्याचा तुरुंगवास भोगला. चांदवडची शिदोरी आणि शेतकरी संघटनेच्या लाखांच्या सभेचे नेतृत्व केले. पाहता पाहता अंगार मळा, आंबेठाण नंतर आनंदी अन्नदाते यांचे वैजापूर येथील स्टेशन रोड वरील घर हे शेतकरी संघटनेचे दुसरे कार्यालयच बनले. या घरात ऐतिहासिक कर्ज मुक्ती आंदोलनाच्या काळात राम जेठमलानी सारख्या ज्येष्ठ वकिलांनी मुक्काम केला. आज राजकारणात सक्रीय असलेले पाशा पटेल, अनिल गोटे, शंकर धोंडगे हे नेते आनंदी अन्नदाते यांचा संघर्ष व नेतृत्वाचे दाखले देतात.
पुढे १९८९ ची वैजापूर विधान सभा निवडणूक ही आनंदी अन्नदाते यांनी शेतकरी संघटना – जनता दल युती तर्फे लढवली. पुढे शेतकरी संघटनेची संघटनात्मक बांधणी घसरली. ९० च्या दशकात आनंदी अन्नदाते यांनी वैजापूरचे नेते आर. एम. वाणी यांच्या पॅनल तर्फे नगर परिषदेची निवडणूक लढवली व नगर सेविका म्हणून निवडून येत वैजापूरचे नगराध्यक्षपद भूषवले. तोट्यातील नगरपालिका फायद्यात आणि एक पैशाचा ही भ्रष्टाचार न करता आनंदी अन्नदाते यांनी वैजापूर नगर परिषदेत स्वच्छ व पारदर्शक कारभाराचा एक आदर्शच निर्माण केला. ४० वर्षांच्या राजकारणात कोणाचा साधा एक कप चहा न पिणारी नेता असा आजही सर्व सामान्य कार्यकर्ता आनंदी अन्नदाते यांचा उल्लेख करतात. नंतर आर एमम वाणी यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यावर त्यांच्या सोबत आनंदी अन्नदाते यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची औरंगाबादच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाली. पुढे विनायक सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून ही त्यांनी असेच पारदर्शक काम केले. जिल्हा आर. एम. वाणी यांनी जिंकलेल्या तिन्ही निवडणुकीत तसेच तत्कालीन खा. चंद्रकांत खैरे यांच्या जिंकलेल्या चारही लोकसभा निवडणुकीत अन्नदाते बाई स्वतःची गाडी घेऊन जीवाचे रान करून प्रचार केला. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचा या दोन्ही नेत्यांच्या विजयात तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या गेल्या 30 वर्षंाच्या वाढीत मोलाचा वाटा असल्याचे सर्व शिव सैनिक मान्य करतात. आनंदी अन्नदाते यांच्या प्रभावी भाषणांची नोंद शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेही घेत. घरावर तुळशी पत्र ठेवत काम करत असताना अन्नदाते बाई यांनी कधी ही तिकीटाची, पदाची किंवा टेंडर व कुठलीही अपेक्षा पक्षा कडून ठेवली नाही. राजकारण हे काही माझे पैसे कमावण्याचे साधन व व्यवसाय नाही हे आनंदी अन्नदाते बड्या नेत्यांना ही वेळ पडल्यास ऐकवत. जुन्या नेत्यांना हे आवडत असे कारण नैतिक व स्वच्छ प्रतिमा असलेल्या आनंदी अन्नदाते आपल्या सोबत असल्याने आपल्याला मते मिळतात ही याची त्यांना जाणीव होती. मध्यंतरी रहिवासी वस्तीत मद्य दुकान असल्याने नागरिकांच्या बाजूने आनंदी अन्नदाते स्त्रियांच्या संरक्षणार्थ उभ्या राहिल्या आणि हेच प्रकरण स्थानिक लोकांना खटकले. याचे निमित्त करत आनंदी अन्नदाते यांच्यासारख्या ज्येष्ठ व नैतिक प्रतिमा असलेल्या निस्वार्थ नेत्याला शिवसेनेकडून डावलले जाऊ लागले. त्यांच्या जागेवर त्यांना न विचारता इतरांची वर्णी लावण्यात आली. चंद्रकांत खैरे यांच्या लोकसभेच्या वेळी मुंबईतील ज्येष्ठ नेते प्रचारासाठी बाहेर पडा. अशी विनवणी करण्यासाठी अन्नदाते बाईंच्या घरी आले. पण लोकसभेत व त्या पूर्वी पक्षातील त्यांची अनुपस्थितीचा मतदानावर फरक पडला . आता पक्षाची गणिते बदलली आहेत. राज्यात सत्ता आली आहे. आर्थिक हितसंबंध व सत्तेतून अर्थ स्त्रोत निर्माण करून देणाऱ्यांची गरजच लोक प्रतिनिधींना स्वतः भीती जास्त वाटते. या वातावरणात शिवसेनेत अन्नदातेबाई सारख्या नेत्याचा जीव गुदमरणे साहाजिक होते. इतर पक्षांच्या त्यांना ऑफर आल्या पण असा पक्ष सोडून इतरपक्षात जाणे अन्नदाते बाईंच्या तत्वात बसणारे नव्हते.

सर्वसामान्यांसाठी आनंदीबाई आजही सक्रीय
त्यांच्या कुटुंबाचा व त्यांचा वैद्यकीय शिक्षण संस्थांचा मोठा विस्तार आहे. या संस्थेत राज्यच नव्हे तर देश भरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यास येत आहेत. पक्षाची गणिते आता बदलली आहेत. एकदा पक्षाने बाळसे धरले की पक्ष वाढवण्यासाठी खसता खाणाऱ्या नेत्यांची पक्षाला अडचण होऊ लागते. आपले आर्थिक अजेंडे राबवण्यासाठी तत्व पळणारी , नैतिकतेची कास धरणारे नेते आडकाठी आणतील म्हणून अन्नदाते बाईसारखे नितिवान नेते पक्षात अडचण वाटू लागतात. तरीही आज ही अनेक जण त्यांचे प्रश्न घेऊन अन्नदाते बाईंकडे येत असतात. सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी झटत आहेत. आपल्या संस्था तसेच इतर सामाजिक कामात सक्रीय राहून हेच समाजकारणाचे माध्यम मानत आनंदी अन्नदाते सर्व सामन्यांसाठी आजही सक्रीय आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here