Marathwada Sathi

21 मार्चपासून पदवीच्या द्वितीय, तृतीय वर्षाच्या परीक्षा

विद्यार्थ्यांचे अकॅडमिक बँक क्रेडिट निर्मितीसाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत
छत्रपती संभाजीनगर:येत्या २१ मार्च पासून पदवीच्या द्वितीय, तृतीय वर्षाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. याबरोबरच नवीन शैक्षणिक धेारणानुसार विद्यार्थ्यांचे अकॅडमिक बँक क्रेडिट महाविद्यालयांनी तयार करुन घ्यावे. १५ एप्रिलपूर्वी ही प्रक्रिया पार पाडावी अशा सूचना रविवारी प्राचार्यांना ऑनलाइन मिटिंगमध्ये देण्यात आल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने संलग्नित सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांची पदवी परीक्षांच्या अनुषंगाने प्र-कुलगुरु श्याम शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन मिटिंग घेण्यात आली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा देखील उपस्थित होते.
२१ मार्च पासून पदवीच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. ४४१ केंद्रांवर १ लाख ५३ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. २८ मार्च पासून पदवीच्या प्रथम वर्ष आणि ११ एप्रिल पासून पद्युत्तरच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु होतील. असे डॉ.मंझा यांनी सांगितले. तर पद्युत्तरच्या झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम अद्याप बाकी आहे.वेळेत निकाल जाहिर करण्यासाठी सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सहकार्य करत वेळेत उत्तरपत्रिका तपासणीचे काम करावे. प्राचार्यांनी उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्याकांना तपासणीसाठी पाठवावे असेही सांगितले.प्रायोगिक तत्वावर सध्या एमएससी पद्युत्तरच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम ऑनलान करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक बँक क्रेडिट अकाऊंट महाविद्यालयांनी करुन घ्यायचे आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत १५ एप्रिल पूर्वी हे काम करावे असेही या बैठकीत सांगण्यात आले आहे.

Exit mobile version