Home औरंगाबाद सराईत चोरांकडून तब्बल २२ दुचाकी जप्त

सराईत चोरांकडून तब्बल २२ दुचाकी जप्त

6260
0

औरंगाबाद : जुन्या शहरातून दुचाकी लंपास करून फायनान्स कंपनीच्या जप्त केलेल्या असल्याची थाप मारून लोकांना विक्री करणाऱ्या सराईत चोरांना सिटी चौक पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई २४ मे रोजी शहागंज भाजीमंडईत करण्यात आली. गोसखा कालेखा पठाण (३५, मूळ रा. नाणेगाव, ता. सिल्लोड, ह.मु. ब्रिजवाडी) आणि नवाबखा उस्मानखा पठाण (४०, रा. वडीगोद्री, ता. भोकरदन, जि. जालना) अशी अटकेतील चोरांनी नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल २२ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्याची माहिती सिटी चौक ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहागंज भाजीमंडई, जामा मस्जिद, कॅन्सर हॉस्पीटल पार्किंग, नवाबजानी गल्ली या भागातून मागील एक महिन्यापासून सतत दुचाकी चोरीला जात होत्या. त्यामुळे सिटी चौक ठाण्याच्या विशेष तपास पथकातील संजय नंद, संदीप तायडे यांनी शहागंज भाजीमंडई परिसरात सापळा लावला. २४ मे रोजी गोसखा पठाण हा मोबाईल फोनवर बोलण्याचा बहाणा करून बनावट चावीने दुचाकीचे हँडल लॉक उघडण्याचा प्रयत्न करताना आढळून आला. त्याला पथकाने ताब्यात घेतले. तेव्हा या भागातून यापूर्वी दुचाकी चोरी केल्याची त्याने कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस कोठडीत चौकशीत त्याने नवाबखा पठाण या साथीदारांच्या मदतीने शहागंज भाजी मंडई, जामा मस्जिद, कॅन्सर हॉस्पीटल पार्किंग, घाटी पार्किंग व अन्य भागातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांचेकडून आणखी दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास उपनिरीक्षक के. डी महांडुळे व त्यांचे पथक करत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त निखील गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक एस. बी. पवार, दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के.डी. महांडुळे, पोलीस नाईक खैरनार, संजय नंद, संदीप तायडे, शेख, माजिद पटेल, देशराज मोरे, संतोष शंकपाळ, गायकवाड यांच्या पथकाने केली.

फायनान्स कंपनीच्या सांगून विक्री

नवाबखा पठाण याच्या घरातून तसेच गोद्री गाव व आजूबाजूच्या गावातून पोलिसांनी तब्बल २२ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या. चोरलेल्या दुचाकीच्या नंबर प्लेट बदलून तसेच दुचाकी थोडाफार बदल करून फायनान्स कंपनीने जप्त केल्याचे सांगून परिसरातील लोकांना विक्री केल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here