Marathwada Sathi

दहावी -बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता

सरकारी कर्मचाऱ्यांनी संपातून सामान्य जनतेला वेठीस धरल्याचा आजचा चौथा दिवस आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर आहेत. एकीकडे रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत तर दुसरीकडे संप कायम राहिल्यास दहावी बारावी बोर्डाचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. दहावी बारावी परीक्षेच्या ७५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत आजचा पेपर झाल्यानंतर ३० लाख उत्तर पत्रिका तपासणी विना पडून राहतील. त्यामुळे निकाल आठवडाभराहून अधिक लांबण्याची शक्यता आहे, अशी माहिती बोर्डाच्या सूत्रांनी दिली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर संकटाचे काळे ढग जमा झाले आहेत. या संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतला आहे. बारावी बोर्डाचे परीक्षा संपत आल्या आहेत. तर दहावी बोर्ड परीक्षेचे आणखी तीन पेपर बाकी आहेत. आणखी आठवडाभर हा संप सुरु राहिल्यास ३० लाख उत्तर पत्रिका दहावी बोर्ड परीक्षेच्या या तपासणी विना पडून राहणार आहेत. सद्यस्थितीमध्ये आजचा पेपर झाल्यानंतर तीस लाख उत्तर पत्रिका या तपासणीविना पडून राहतील. त्यामुळे निकाल वेळेत जाहीर व्हावा, त्या दृष्टिकोनातून संपासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे.बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी तसेच अकरावीच्या परीक्षा, मूल्यमापन, अध्यापन करणार नसल्याची भूमिका स्पष्ट करत जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या १४ मार्चपासून सुरु होणाऱ्या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे शिक्षक केवळ बारावीच्या परीक्षा विषयक कार्य करतील आणि इतर कोणतेही कार्य करणार नाहीत. महाविद्यालयाची कोणतीही कामं करणार नाहीत, हे महासंघाने स्पष्ट केलं आहे.जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संप सुरु झाल्यानंतर गणित भाग २, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २, सामाजिक शास्त्र पेपर १, सामाजिक शास्त्र पेपर २ या पाच विषयांचे पेपर बाकी होते. त्यामुळे आता या परीक्षा झाल्यानंतर या उत्तरपत्रिका तपासणी विना पडून राहणार आहेत. दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणे अपेक्षित असतं मात्र जर असाच संप सुरु राहिला तर या निकालामध्ये एक आठवड्याचा विलंब होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version