Marathwada Sathi

कोविशील्ड लसीचे १००० डोस गोठलेले…!

मराठवाडा साथी न्यूज

गुवाहाटी : कोविशील्ड लसी संदर्भात धक्कादायक बाब समोर आली आहे.आसामच्या सिल्चर मेडिकल कॉलेजमध्ये कोविशील्ड या लसीचे चक्क १००० डोस गोठलेल्या अवस्थेत आढळले आहेत.हे डोस गोठलेल्या अवस्थेत आढळल्या नंतर लगेच आसामच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. कोल्ड चेन स्टोअरजमधील बिघाडामुळे एसएमसीएचमध्ये कोरोना लसीचे डोस गोठले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आरोग्य सेवेचे संचालक मुनींद्र नाथ नकाते यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की,”लसीचे डोस गोठले असल्याची माहिती आम्हाला मिळाली. कोल्ड स्टोअरेजमधील बिघाडामुळे डोस गोठले असावेत.परंतु याचे नेमके कारण तपासणीनंतरच समोर येईल.” गोठलेले डोस प्रभावी ठरतील का याबाबत विचारला असता नकाते म्हणाले की, “हे डोस तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातील.” “या घटनेत निष्काळजीपणा करणाऱ्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाऊ शकते,”असेही ते म्हणाले.

दरम्यान,लसीचे हे डोस खराब आहेत की चांगले हे अद्याप आरोग्य विभागाने स्पष्ट केलेले नाही.शनिवारी कोरोना लसीकरणाच्या अभियानाला सुरुवात झाल्यानंतरच लस गोठल्याचे समोर आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

Exit mobile version